belgaum

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही भारतीय संस्कृतीचे जतन महत्त्वाचे – उपराष्ट्रपती

0
242
 belgaum

बेळगाव लाईव्ह:
संपूर्ण जगभरात आज सर्व क्षेत्रांत आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असला तरी भारतीय संस्कृतीचे महत्त्व अजूनही तितकेच आहे. आपल्या चालीरीती, रूढी-परंपरा, यात्रा-महोत्सव, देशभरातील विविध मठ व धार्मिक स्थळांमुळेच हिंदू संस्कृती टिकून राहिली आहे. संस्कृतीचे जतन करण्यासाठी युवापिढी सुदृढ व संस्कारी बनणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील असून दया, धर्म, संस्कृती आणि आत्मविश्वास यांच्या आधारावर समाजाने पुढे जाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

येडूर येथे सुरू असलेल्या राजगोपूर लोकार्पण, कृष्णारती, लक्षदीपोत्सव व महाकुंभाभिषेक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रीशैल पीठाचे जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, काशी पीठाचे ज्येष्ठ जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, काशी पीठाचे नूतन जगद्गुरू मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, उज्जैन महापीठाचे जगद्गुरू डॉ. सिद्धलिंगराज देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामी, पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे, विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, मंत्री एम. बी. पाटील, आमदार गणेश हुक्केरी तसेच राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती राधाकृष्णन पुढे म्हणाले की, प्राचीन काळापासून भारत देशाला साधू-संत व महात्म्यांचे मोठे योगदान लाभले आहे. त्यांच्या कार्यामुळेच भारतीय संस्कृती आजपर्यंत टिकून आहे. आजही देशभरात विविध आध्यात्मिक केंद्रे, मठ व शैक्षणिक संस्था कार्यरत असून तेथे वेद, संस्कृत आणि अध्यात्मिक शिक्षण दिले जात आहे. या केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध मठांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

 belgaum

कर्नाटक व महाराष्ट्रात वीरशैव समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाच्या मठांमधून विद्यार्थ्यांना वेद, संस्कृत व अध्यात्मिक विचारांचे प्रशिक्षण देऊन सुसंस्कृत समाज घडविण्याचे कार्य सुरू आहे. तसेच भाविकांसाठी दासोह सेवा व अन्नदानासारख्या उपक्रमांमुळे समाजाला बळकटी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक येडूर क्षेत्राला आपण प्रथमच भेट दिल्याचे सांगत त्यांनी येथील धार्मिक व आध्यात्मिक परंपरेचे कौतुक केले. या क्षेत्राच्या विकासासाठी स्वामीजींचे योगदान मोठे असून महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सांगितले की, हिंदू संस्कृती व सनातन धर्म टिकवण्यासाठी साधू-संत आणि मठाधीशांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्यामुळेच भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. आधुनिकतेच्या काळातही ग्रामीण भागात जपली जाणारी भारतीय संस्कृती आदर्शवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

येडूर काडसिद्धेश्वर संस्थान मठ व वीरभद्र देवस्थानचे धर्माधिकारी डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी म्हणाले की, देशातील विविध मठांच्या विकासासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यात्मिक केंद्रांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. तसेच श्रीशैल पीठाच्या विकासासाठी केंद्र सरकारने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

या कार्यक्रमास विविध मान्यवर, मठाधीश व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आ. प्रकाश हुक्केरींना ‘विकासवीर’ पुरस्कार

गेल्या चार दशकांपासून ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत आपली राजकीय कारकीर्द गाजवणारे आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे माजी खासदार, माजी मंत्री व सध्याचे विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांना काडसिद्धेश्वर संस्थान मठ व वीरभद्र देवस्थानातर्फे ‘विकासवीर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देण्यात आला.


पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा नागरी सत्कार

आरोग्य सेवा व गुणवत्तापूर्ण शिक्षण क्षेत्रात गेल्या चार दशकांपासून उल्लेखनीय कार्य करून देश-विदेशात संस्थेचा विस्तार केल्याबद्दल डॉ. प्रभाकर कोरे यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. त्याबद्दल उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन व स्वामीजींच्या उपस्थितीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.