belgaum

चिकोडी जिल्ह्याची घोषणा करण्यास सरकार कटिबद्ध –

0
473
 belgaum

बेळगाव लाईव्ह ,:राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकार आगामी काळात राज्यातील विविध विकासकामांसोबतच रेंगाळत पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच चिकोडी, अथणी व रायबाग तालुक्यातील जनतेसाठी महत्त्वाची असलेल्या चिकोडी जिल्ह्याच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.

येडूर येथे वीरभद्र देवस्थान व काडसिद्धेश्वर संस्थान मठाच्या वतीने आयोजित महाकुंभाभिषेक, लक्ष दीपोत्सव, राजगोपुर लोकार्पण, कृष्णारती, वीरशैव-लिंगायत धर्मस्थान संमेलन तसेच यात्री निवास उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी श्रीशैल पीठाचे जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, काशी पीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, उज्जैन पीठाचे जगद्गुरू डॉ. सिद्धलिंगराज देशिकेंद्र शिवाचार्य स्वामी, काशी पीठाचे नूतन जगद्गुरू मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य स्वामी, केएलई शिक्षण संस्थेचे गौरव कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे, विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी तसेच चिदानंद कोरे साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे उपस्थित होते.

 belgaum

उपमुख्यमंत्री शिवकुमार पुढे म्हणाले की, समाजात प्रत्येक जण आपापला समाज व धर्म एकत्र करण्यासाठी प्रयत्नशील आहे. वीरशैव समाज विखुरलेला असला तरी पंचपीठाधीशांनी एकत्र येऊन समाज एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. धर्माचे रक्षण केले तरच समाजाचे संरक्षण होऊ शकते. आजची युवापिढी धर्म व अध्यात्मापासून दूर जात असल्याने मठांच्या माध्यमातून शिक्षण दासोह, आध्यात्मिक प्रवचने आणि सामाजिक उपक्रम राबवून समाज परिवर्तनासाठी प्रयत्न सुरू आहेत. समाज सुदृढ होण्यासाठी अध्यात्माचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचेही त्यांनी सांगितले.

पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलई शिक्षण संस्थेचा विस्तार देशासह परदेशात करून मोठा नावलौकिक मिळवला आहे. आधुनिक तंत्रज्ञान व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे या संस्थेचे विद्यार्थी जगभरात कार्यरत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविल्याचे शिवकुमार यांनी नमूद केले.

तसेच माजी खासदार, माजी मंत्री व विद्यमान विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कोणतेही सरकार सत्तेत असले तरी राज्यातील विविध विभागांच्या महत्त्वाच्या योजना चिकोडी-सदलगा मतदारसंघात राबविल्या आहेत. मतदारसंघात शाश्वत विकासकामे करून त्यांनी विकासवीर म्हणून आपली ओळख निर्माण केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या प्रकाश हुक्केरी यांच्या रेखाचित्राचेही विशेष कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमास विविध मठाधीश, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, साखर कारखान्यांचे संचालक, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.