बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या प्यास फाऊंडेशनने आपला सीएसआर भागीदार, एकेपी फेरोकास्टच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील हलशिवाडी येथील दोन तलावांचे पुनरुज्जीवन करून त्यांचा विकास साधण्याच्या आपल्या प्रकल्पाचा नुकताच शुभारंभ केला आहे.
हलशिवाडी येथील दोन तलावांच्या पुनरुज्जीवन व विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा गेल्या गुरुवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पार पडला. ज्यामुळे या प्रकल्पाचा औपचारिक प्रारंभ झाला.
याप्रसंगी बोलताना प्यास फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू म्हणाले की, या प्रकल्पामुळे येत्या कांही वर्षांत शेतकरी आणि रहिवाशांना मुबलक पाणी उपलब्ध होईल. त्यांनी भंडारे परिवाराचे, विशेषतः या प्रकल्पाचे सीएसआर भागीदार, एकेपी फेरोकास्टच्या सहकार्याबद्दल पराग भंडारे आणि प्रीती भंडारे यांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ गावकरी वामन देसाई यांनी केलेल्या पारंपरिक विधींनी झाली.
त्यानंतर कामाचे औपचारिक उद्घाटन करण्यासाठी प्रतिकात्मक भूमिपूजन सोहळा पार पडला. आपल्या प्रास्ताविक भाषणात माजी ता. पं. सदस्य चंद्रकांत देसाई यांनी या प्रकल्पामुळे पाण्याची टंचाई कमी होण्यास, भूजल पातळी सुधारण्यास आणि गावाच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यास मदत होईल असे सांगून प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक रहिवाशांकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासनही दिले.
याप्रसंगी प्यास फाउंडेशनचे उपाध्यक्ष अभिमन्यू डागा, सचिव डॉ. प्रीती कोरे, सहसचिव अवधूत सामंत, खजिनदार लक्ष्मीकांत पसारी, संचालक रोहन कुलकर्णी, दीपक औलकर, अजय आचार्य, दत्तात्रय देसाई, माणिक देसाई, रघुनाथ देसाई, विनायक देसाई, रवींद्र देसाई, सुधीर देसाई, मिलिंद देसाई, देसाई, मिलिंद देसाई, श्रीमान देसाई, ग्रामस्थ प्रकाश देसाई, विष्णू देसाई, रमेश देसाई, उमेश देसाई, लव देसाई, नारायण देसाई, प्रमोद देसाई, राजन सुतार, विनोद देसाई यांच्यासह बरेच गावकरी उपस्थित होते.
शेती आणि ग्रामीण उपजीविकेवर पाण्याच्या टंचाईचा वाढता परिणाम लक्षात घेऊन, फाऊंडेशनने हलशीवाडी येथील या दोन महत्त्वाच्या तलावांच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पात गाळ काढणे, संरचनात्मक दुरुस्ती आणि पाणी साठवण क्षमता वाढवणे यांचा समावेश आहे.
प्रभावी जल व्यवस्थापन हे आपल्या काळातील सर्वात महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक आहे. तलावांचे पुनरुज्जीवन केल्याने पावसाच्या पाण्याचे संवर्धन होण्यास आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत होते. या उपक्रमामुळे हलशीवाडी आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना विश्वसनीय पाणी पुरवठा सुनिश्चित होऊन मोठा फायदा होईल आणि गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या निकालात निघण्यास मदत होईल.


