बेळगाव लाईव्ह :राज्यात यंदा उन्हाळा अधिकच तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व विभागांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांना उष्णतेच्या लाटेबाबत स्वतंत्र कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मार्च ते मे दरम्यान राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. वाढते तापमान लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींवर गंभीर परिणाम करू शकते. त्यामुळे दुपारी 12 ते 3 या काळात शक्यतो बाहेर जाणे टाळून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) जलस्त्रोतांतील पाणी पिण्याच्या वापरासाठी प्राधान्याने राखीव ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावे ओळखून टँकरद्वारे पाणीपुरवठा, खाजगी बोरवेल्सचा वापर, विद्यमान पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, हातपंपांची देखभाल आणि पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे आठवड्याला आढावा बैठक घेऊन परिस्थितीचे मूल्यांकन करणे बंधनकारक केले आहे. उन्हाळ्यात आगीच्या घटनांचा धोका वाढतो. त्यामुळे रुग्णालय, उद्योग आणि गर्दीच्या ठिकाणी अग्नीसुरक्षा तपासण्या नियमितपणे घेणे, अग्नी सुरक्षा लेखापरीक्षण सक्तीचे करणे आणि रासायनिक साठवण असलेल्या गोदामांमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.




