belgaum

रंगाची उधळण करत शहरात रंगपंचमी अपूर्व उत्साहात साजरी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :एकमेकांवर विविध रंगाची उधळण, ठिकठिकाणी सुरू असलेली स्प्रिंकलर्सची पाणी फवारणी आणि डीजेच्या तालावर बेभान थिरकणारी तरुणाई अशा वातावरणात बेळगाव शहर परिसरात आज मंगळवारी रंगपंचमी अर्थात धुळवड जल्लोषी वातावरणात शांततेने साजरी झाली. शहरवासीयांनी एकमेकांना रंग लावून होळी -रंगपंचमीच्या शुभेच्छा देत अपूर्व उत्साहात सणाचा आनंद लुटला.

शहर, उपनगरं आणि आसपासच्या परिसरात काल सोमवारपासूनच रंगपंचमीची तयारी सुरू होती. बाजारपेठेत विविध रंग, पिचकारी, वेगवेगळे मुखवटे वगैरे रंगपंचमीच्या साहित्याची खरेदी तेजीत होती. काल रात्री होळी पेटल्यानंतर रंगोत्सवाला प्रारंभ झाला.

रात्री सर्वत्र टिमक्या वाजवत हौशी तरुणाईने रंगपंचमीला सुरुवात केली. तथापी आज मंगळवारी या रंगोत्सवाला खऱ्या अर्थाने उधाण आले होते. दरवर्षीप्रमाणे रंगपंचमी साजरी करताना युवा पिढी आणि बाल चमुचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध पोशाख-वेषांमध्ये मुखवटे धारण केलेले युवक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.

 belgaum

त्याचप्रमाणे गल्लोगल्ली बालगोपाल एकमेकांना पिचकारीतील रंगाने भिजवत रंगोत्सवात तल्लीन झालेले दिसत होते. शहरातील चव्हाट गल्ली, कामत गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, गोंधळी गल्ली वगैरे विविध गल्ल्यांसह चन्नम्मानगर, टिळकवाडी, अनगोळ वगैरे उपनगरांमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने रस्ते, उद्याने आदी ठिकठिकाणी पाण्याचे फवारे सोडणारे स्प्रिंकलर्स उभारण्यात आले होते.

उन्हामध्ये डीजेच्या तालावर त्या ठिकाणी तरुणाईने बेभान ‘रेन डान्स’ करत पाण्याच्या गारव्यासह रंगोत्सवाचा आनंद लुटला. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर दरवर्षीप्रमाणे ‘होली मिलन’ हा सामूहिक रंगोत्सवाचा कार्यक्रम तरुणाईच्या भरघोस प्रतिसादासह जल्लोषात पार पडला.

दरवर्षीप्रमाणे होळी-रंगपंचमी निमित्त शहरातील पांगुळ गल्ली येथील जागृत देवस्थान श्री अश्वत्थामा मंदिर येथे परंपरागत लोटांगणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रहणामुळे सदर कार्यक्रम सकाळी लवकर भक्तीभावाने पार पाडण्यात आला. मंदिरासमोर रस्त्यावर लोटांगण घालण्याच्या या कार्यक्रमात शेकडो भाविकांनी सहभाग दर्शवला होता.

आज धुलीवंदना दिवशी ग्रस्तोदित चंद्रग्रहण होते आणि त्याचा वेधकाळ सकाळी सूर्योदयापासून सुरू झाला होता. त्यामुळे ग्रहणाबद्दल अनेक तर्कवितर्क केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांनी आवश्यक पथ्य पाळून होळी व रंगपंचमी उत्साहात शांततेने साजरी केली हे विशेष होय.

होळीसह रंगपंचमी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि उपनगरात 1000 हून अधिक अधिकारी व पोलिस, तसेच राज्य राखीव दलाच्या 7 आणि शहर सशस्त्र दलाच्या 10 तुकड्या यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होळी व रंगोत्सव शांततेत पार पडावा यासाठी 500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, 8 ड्रोन कॅमेरे व बॉडीवॉर्न कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.