बेळगाव लाईव्ह : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेल्या सन २०२६-२७ च्या राज्य अर्थसंकल्पाचे बेळगावमधील नागरिक आणि व्यापारी समुदायाने स्वागत केले आहे. कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक वाढीवर सरकारने दिलेला भर कौतुकास्पद असल्याचे मत समुदायाने व्यक्त केले आहे.
बेळगाव परिसरात मोठ्या औद्योगिक पार्कची केलेली घोषणा हा एक सकारात्मक टप्पा असून, यामुळे उत्तर कर्नाटकातील आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील, असा विश्वास ‘सिटिझन्स अँड ट्रेडर्स कौन्सिल’ने व्यक्त केला आहे.
मात्र, राज्याचे प्रमुख व्यापारी आणि औद्योगिक केंद्र असूनही, या अर्थसंकल्पात बेळगावला विकासाचा अधिक मोठा वाटा मिळायला हवा होता, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली आहे.
शहरातील बाजारपेठांचे आधुनिकीकरण, नागरी विकास आणि विशेषतः मध्यम व लघु उद्योग क्षेत्राला बळकट करण्यासाठी अधिक निधीची आवश्यकता असल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले.
बेळगावने नेहमीच राज्याच्या अर्थव्यवस्थेत व्यापार, उत्पादन आणि कृषी क्षेत्रातून मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकारने बेळगाव आणि उत्तर कर्नाटकसाठी अतिरिक्त विकास पॅकेज आणि विशेष प्रकल्पांची घोषणा करावी, अशी विनंती सिटिझन्स अँड ट्रेडर्स कौन्सिल, बेळगावच्या वतीने करण्यात आली आहे.





