बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या ऑटो नगर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी ई-मालमत्ता पत्राच्या मागणीसाठी आज महापालिकेवर धडक दिली. गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करूनही कागदपत्रे मिळत नसल्याने संतापलेल्या उद्योजकांनी पालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
ऑटो नगर औद्योगिक क्षेत्रातील मालमत्तांच्या ई-नोंदणीसाठी अर्ज करून एक वर्ष उलटले तरी अधिकारी दाद देत नसल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. ई-मालमत्ता पत्र नसल्यामुळे बँकांकडून कर्ज मिळवण्यात अडचणी येत असून, व्यवसायाचा विस्तार करणे अशक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. केवळ एका साध्या उत्तरासाठी तीन-तीन महिने वाट पाहायला लावणाऱ्या प्रशासकीय दिरंगाईवर यावेळी कडाडून टीका करण्यात आली.
यावेळी बोलताना उद्योजकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर संशय व्यक्त केला. अधिकारी केवळ वजनदार आणि श्रीमंत लोकांचीच कामे तत्परतेने करतात, तर सामान्य उद्योजकांना हेलपाटे घालायला लावतात, अशी व्यथा त्यांनी मांडली.

आपल्याच कायदेशीर मालमत्तेचे हक्क मिळवण्यासाठी इतका वेळ का लागतो, असा रोकडा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला.
प्रशासनाने तातडीने ई-मालमत्ता पत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण न केल्यास, आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सर्व उद्योजकांनी दिला आहे.




