बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी परिसरात सोलर प्रकल्पाच्या नावाखाली निसर्गाचा मोठा विनाश सुरू असल्याचे समोर आले आहे.
श्री कौरीगुडा रेणुका देवी मंदिर परिसरात कोणत्याही परवानगीशिवाय सुमारे १० हजार झाडांची कत्तल करण्यात आली असून, यामध्ये चंदनासारख्या मौल्यवान झाडांचाही समावेश आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बडाल अंकलगी गावच्या व्याप्तीत असलेल्या मंदिर परिसरातील जंगल सोलर प्रकल्पासाठी नष्ट केले जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी अवघ्या एक किलोमीटर अंतरावर ५५ एकर सरकारी पडीक जमीन उपलब्ध असतानाही, अधिकाऱ्यांनी दाट जंगल असलेल्या जमिनीची निवड कशी केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी न करताच या जमिनीला मंजुरी दिली का, असा संशय आता व्यक्त केला जात आहे.
या प्रकल्पाच्या कंत्राटदाराने वनविभागाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने हजारो झाडे मुळासकट उखडून टाकली आहेत. यामध्ये चंदनाची झाडे चोरून नेल्याचाही आरोप होत असून, कोट्यवधी रुपयांच्या वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे.

ही घटना समजताच भाजप बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपला तीव्र निषेध नोंदवला.
या प्रकरणातील दोषींना बुधवारपर्यंत अटक न केल्यास, गुरुवारी सकाळी बेळगावच्या डीएफओ कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा धनंजय जाधव आणि ग्रामस्थांनी दिला आहे.




