बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अवैध मटका जुगाराविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली असून, सोमवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या छाप्यात दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. माळमारुती आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकांनी ही कारवाई केली असून पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
पहिली कारवाई माळमारुती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीशैल मुळगुंद आणि त्यांच्या पथकाने उज्वल नगर येथील रेल्वे ट्रॅकजवळ केली. येथे फारुख बादशहा बनारसी (वय ३४) याला सार्वजनिक ठिकाणी मटका घेताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष दळवाई यांनी बाजी गावच्या हद्दीत केली. येथे बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याच्या कडेला मटका जुगार चालवणारा इनायतखान सत्तारखान अल्लावर (वय ५८) याला अटक करण्यात आली. हा आरोपी मूळचा हावेरी जिल्ह्यातील असून सध्या महाराष्ट्रातील शिनोळी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ९,९७० रुपये रोख आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. अवैध धंद्यांविरुद्ध ही यशस्वी मोहीम राबवल्याबद्दल पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी संबंधित पोलीस पथकांचे कौतुक केले आहे.

बेळगावात जुगार आणि अवैध दारू विक्री अड्ड्यांवर पोलिसांचे छापे
अवैध दारू विक्री आणि गांजा सेवन प्रकरणी अकरा जणांना अटक
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अवैध जुगार, दारू विक्री आणि अमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यांमध्ये एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
पहिली कारवाई बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक नागूनगौडा कट्टमणीगौडा आणि त्यांच्या पथकाने केली. यळ्ळूर-अनगोळ रस्त्यावरील मोकळ्या जागेत ‘अंदर-बाहर’ नावाचा जुगार खेळणाऱ्या ८ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ९,९८० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत, उद्यमबाग पोलिसांनी बादरवाडी क्रॉस जवळील एका बार शेजारी अवैध दारू विक्री करणाऱ्या परमेश्वर देवप्पा नाईक याला अटक केली. त्याच्याकडून गोव्यातील बनावट मद्यासह एकूण ५,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे एपीएमसी पोलिसांनी रामनगर भागात छापा टाकून अशोक राम ईचल याला अटक केली आणि त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या देशी-विदेशी दारूचे टेट्रा पॅक जप्त केले.
खडेबाजार पोलिसांनी अनगोळ रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वर्तन करणाऱ्या मयूर सुभाष राऊत याला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्याने गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शहर पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.




