belgaum

नगरसेवकाच्या प्रयत्नामुळे आठवडी बाजाराला शिस्त

0
909
 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहापूर -खासबाग येथील आठवडी बाजारामुळे होणाऱ्या वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक रवी साळुंके यांच्या पुढाकाराने आज रविवारी सकाळी चुन्याचे आरेखन करून सदर बाजारात शिस्त निर्माण करण्यास प्रारंभ झाला आहे.

शहापूर -खासबाग येथील आठवडी बाजाराच्या दिवशी विक्रेत्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण, नियोजन शून्य मांडव, वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असतो. यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. याखेरीज सदर आठवडी बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या घटना देखील वारंवार घडत असल्याच्या तक्रारी होत्या.

या सर्व गोष्टींची दखल घेत शहापूर प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक रवी साळुंके यांनी बाजारात शिस्त निर्माण करण्यासाठी मागील आठवड्यात महापालिका आयुक्त, त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योतिबा निकम पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत खासबाग आठवडी बाजार परिसराचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी विक्रेत्यांनी आपल्याला जागा नेमून देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती.

 belgaum

त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांना ठराविक जागेचे आरेखन करून नियोजित पद्धतीने बसविण्यात येईल असे स्पष्ट केले होते. नगरसेवक साळुंके यांच्या सहकार्याने येत्या आठवड्यापासून बाजारात शिस्त लावण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.

त्यानुसार आज रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी सकाळी नगरसेवक रवी साळुंके यांच्या देखरेखी खाली बाजारात चुन्याच्या रेषा ओढून आलेखन करण्यात आले. तसेच त्या आरेखनानुसार विक्रेत्यांना जागा नेमून देण्यात आल्या. त्यामुळे बाजाराला शिस्त लागून रस्ता देखील प्रशस्त झाला होता. परिणामी भाजीपाला विक्रेते, पादचारी आणि वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत होते.

गेल्या 30 वर्षापासून अधिक काळापासून भरणाऱ्या शहापूर खासबाग येथील आठवडी बाजारात शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतकरी महिला स्वतः भाजीपाला विकण्यासाठी येत असतात.

तथापि आतापर्यंत हा बाजार विस्कळीतरित्या भरत होता. आता नगरसेवक साळुंके यांच्या प्रयत्नांमुळे या आठवडी बाजाराला वरील प्रमाणे पहिल्या प्रयत्नातच 50 टक्के शिस्त लागल्याचे दिसून आल्याबद्दल परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत असून ते नगरसेवक रवी साळुंके यांची प्रशंसा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.