belgaum

शिवसृष्टी रस्ता भूसंपादन प्रकरणी महापालिकेला दणका; २.१८ कोटी भरपाई द्या

0
606
City corporation bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहापूर येथील शिवसृष्टी समोरील रस्त्यासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात हायकोर्टाच्या धारवाड खंडपीठाने बेळगाव महानगरपालिकेला २.१८ कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले असून दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.

शहापूर येथील प्रलंबित शिवसृष्टी रस्ता प्रश्नी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ज्या कुटुंबाची जमीन या रस्त्यासाठी वापरण्यात आली, त्या गर्गट्टी कुटुंबाला २.१८ कोटी रुपये देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी बेळगाव महानगरपालिकेने दोन आठवड्यांत कार्यवाही पूर्ण करून प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे धारवाड खंडपीठाने स्पष्ट केले.

यापूर्वी डिसेंबर महिन्यात नुकसान भरपाई न दिल्याबद्दल न्यायालयाने कडक भूमिका घेतली होती. त्यावेळी स्मार्ट सिटी योजनेच्या व्यवस्थापकीय संचालकांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता आणि जामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आले होते. मात्र, त्यानंतरच्या सुनावणीत स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता वारंगल यांनी न्यायालयात हजर राहून रस्ता अधिकृतपणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्याची माहिती दिली. शासन निर्णयाच्या आधारे हा रस्ता आता महापालिकेच्या अखत्यारीत असल्याचे कविता वारंगल यांनी स्पष्ट केले.

या माहितीच्या आधारे न्यायालयाने आता नुकसान भरपाईची जबाबदारी स्मार्ट सिटीकडून बेळगाव महानगरपालिकेकडे सोपवली आहे. २७ ऑक्टोबर रोजी जेव्हा पहिला आदेश आला होता, तेव्हा ही जबाबदारी नेमकी कोणाची यावर स्पष्टता नव्हती. त्यावेळी महानगरपालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालक ही दोन्ही पदे शुभा बी. यांच्याकडेच होती, मात्र अंतिम निर्णय न झाल्याने हे प्रकरण सुरुवातीला स्मार्ट सिटी विभागाकडे राहिले होते. आता स्मार्ट सिटीची कामे महापालिकेकडे वर्ग झाल्याने ही कायदेशीर जबाबदारी नागरी संस्थेवर आली आहे.

विशेष म्हणजे, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यायालयाने १७.९९ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता सुधारित उत्तरदायित्वावरून ही रक्कम २.१८ कोटी रुपये झाली असून ती महानगरपालिकेला द्यावी लागणार आहे. सध्या हा बंद असलेला रस्ता पुन्हा खुला करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच न्यायालयाचा हा आदेश आल्याने महापालिकेला आता तातडीने पावले उचलावी लागणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.