बेळगाव लाईव्ह : समाजासाठी दयाळू आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवांकडे खासगी रुग्णालयांनी अधिक लक्ष देण्याचे आवाहन करताना, कर्नाटकचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी अनेक खासगी रुग्णालयांनी केलेल्या विलक्षण सेवांची प्रशंसा केली. ते मंगळवारी सकाळी रुग्णालयाच्या आवारात झालेल्या डेक्कन मेडिकल सेंटरच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रौप्यमहोत्सवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दोड्डण्णावर दांपत्यांच्या हस्ते रौप्यमहोत्सवी फलकाचे अनावरण करण्यात आले आणि केक कापण्यात आला.
यावेळी आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी सांगितले की, वैद्यकीय सेवांना अत्याधुनिक करणे हेच राज्य सरकारचे मुख्य ध्येय आहे. त्यांच्या सरकारच्या काळात नवीन तालुक्यांसाठी नवीन रुग्णालये मंजूर करण्यात आली असून, सरकार कृत्रिम बुद्धिमत्तेनंतरचे अत्याधुनिक तंत्रज्ञान देऊन आरोग्य क्षेत्र मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. रजत महोत्सव साजरा करत असलेल्या डेक्कन मेडिकल सेंटरने १०० खाटांवरून १००० खाटांचे रुग्णालय व्हावे आणि उत्तम सेवा देत राहावी, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

मंत्री गुंडुराव म्हणाले, “अनेक खासगी रुग्णालये आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देत आहेत. परंतु डेक्कन मेडिकल सेंटरने परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा देऊन आणि करुणेने सेवा करून इतर खासगी रुग्णालयांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. उच्च दर्जाची खासगी रुग्णालयेही या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.”
जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, ‘डेक्कन मेडिकल सेंटर’ने बेळगाव आणि आसपासच्या भागातील नागरिकांना निःस्वार्थपणे सेवा देत आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. डॉ. दोड्डण्णावर हे निष्णात वैद्य असून, मातृभूमीमध्ये सेवा देत असणे प्रशंसनीय आहे. ‘डेक्कन मेडिकल’ सुरुवातीपासूनच गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना सेवा देत आले आहे. त्यांच्या २५ वर्षांच्या या कामगिरीसाठी शुभेच्छा देत, त्यांनी नवीन तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात आणून रुग्णांची सेवा करावी आणि यशाच्या शिखरावर पोहोचावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
के.एल.ई.एस.चे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनीही डॉ. रमेश आणि डॉ. सवित्री दोड्डण्णावर यांच्या निःस्वार्थ आणि अखंड सेवेची प्रशंसा करताना सांगितले की, आजच्या परवानाधारक व्यवस्थेतील अडथळ्यांमुळे खासगी रुग्णालय चालवणे सोपे नाही, तरीही त्यांनी ते यशस्वीपणे चालवले आहे. रुग्णालयाचे संस्थापक डॉ. रमेश दोड्डण्णावर म्हणाले की, परदेशात शिक्षण घेतल्यानंतरही देशातील जनतेच्या सेवेसाठी २५ वर्षांपूर्वी बेळगावात सेवा सुरू करण्यात आली. बेळगावसह उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपचार दिले जात आहेत.
रुग्णालयाच्या प्रशासकीय संचालिका डॉ. सवित्री दोड्डण्णावर यांनी स्वागतपर भाषणात रुग्ण व शुभेच्छुकांचे त्यांच्या विश्वास आणि सहकार्याबद्दल आभार मानले. डॉ. रमेश दोड्डण्णावर यांनी गेल्या २५ वर्षांच्या ‘डेक्कन मेडिकल सेंटर’च्या प्रवासाचा आढावा घेत पुढील योजना मांडल्या.
भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सचिव विनोद दोड्डण्णावर यांनी डॉ. रमेश आणि डॉ. सवित्री दोड्डण्णावर यांचे संस्थेला सातत्याने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि १०० खाटांचे रुग्णालय नर्सिंग कॉलेजसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. संचालक श्लोका आणि राज दोड्डण्णावर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, के.एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, माजी मंत्री व आमदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार संजय पाटील आणि सुनील हणमन्नावर उपस्थित होते.



