Tuesday, July 15, 2025

/

रेशन दुकानदारांची सरकारकडे ‘अशी’ मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरातील सरकारी रेशन दुकानदारांनी थर्मल प्रिंटर खरेदीचा भार हलका करण्यासाठी थेट सरकारला साकडे घातले आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाकडूनच हे प्रिंटर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी बेळगाव जिल्हा सरकारी रेशन वितरक कल्याण संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आले आहे.

संघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विभागाचे अधिकारी रेशन दुकानदारांवर थर्मल प्रिंटर बसवण्यासाठी दबाव आणत आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून कमिशन न मिळाल्याने रेशन दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, स्टेशनरीचा खर्च आणि वाढीव वीज बिल यामुळे दुकानदारांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. अशा स्थितीत थर्मल प्रिंटर खरेदी करणे त्यांना शक्य नाही. यामुळे, सरकारने या अडचणीची दखल घेऊन विभागानेच हे थर्मल प्रिंटर खरेदी करून दुकानदारांना पुरवावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

 belgaum

तसेच, प्रिंटरसाठी आवश्यक असलेले पेपर्स आणि काडतुसे देखील विभागानेच नियमितपणे उपलब्ध करून द्यावीत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रेशन दुकानदारांच्या या मागणीमुळे त्यांच्या आर्थिक अडचणी आणि सरकारी आदेशांमुळे त्यांच्यावर येणारा ताण पुन्हा एकदा समोर आला आहे.

सरकारने या मागणीकडे लक्ष देऊन रेशन दुकानदारांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे निवेदन सादर करताना बेळगाव जिल्हा सरकारी रेशन वितरक कल्याण संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.