Wednesday, June 18, 2025

/

बेळगावचे ज्योतिर्लिंग देवस्थान : श्रद्धेचा केंद्रबिंदू

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या श्रद्धास्थानांमध्ये एक नवे तेजस्वी नाव म्हणजे शिवबसव नगर येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान. कोल्हापूरच्या मंदिराचे प्रतिकात्मक स्वरूप घेऊन उभारले गेलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचेच नव्हे तर समाजसेवेचेही केंद्र बनले आहे.

बेळगाव व परिसरातील नागरिकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनलेले श्री ज्योतिर्लिंग देवस्थान हे कोल्हापूर येथील ज्योतिर्लिंगाच्या धर्तीवर स्थानिक श्रद्धास्थान म्हणून उभारण्यात आले. कोल्हापूरमध्ये मुख्य ज्योतिर्लिंग देवस्थान हे सार्वजनिक आहे. मात्र कोल्हापूर परिसरात अन्य काही देवस्थाने खासगी मालमत्तेत असल्यामुळे काही भक्तांना दर्शनास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे बेळगावमधील भक्तांसाठी स्थानिक पातळीवर भव्यदिव्य मंदिर असावे, अशी दीर्घकाळची मागणी होती.

या मागणीला मूर्त रूप देण्यासाठी चव्हाट गल्लीच्या धार्मिक परंपरेशी जोडलेली शिवबसव नगरमधील जागा निवडण्यात आली. याठिकाणी पूर्वीपासूनच यात्रा, वास्तव्य, महाप्रसाद घेण्याची पारंपरिक पद्धत सुरू होती. भाविक कोल्हापूरहून दर्शन घेऊन येथे एक दिवस वास्तव्य करायचे आणि परतायचे, ही परंपरा अनेक वर्षांपासून चालू होती. चव्हाट गल्ली येथील सासणकाठी यात्रेची जुनी परंपरा आहे.

या यात्रेनंतर शिवबसव नगर येथील जागेवर अनेक भाविक येऊन थांबत असत. हे भाविक कोल्हापूर येथील ज्योतिर्लिंग देवदर्शन करून परतताना या ठिकाणी मुक्काम करत. याठिकाणी आंबील घुगऱ्यांची यात्रा भरत असे. एक दिवस वास्तव्य करून, महाप्रसाद घेतल्यानंतर भाविक आपल्या गावी परतत असत. रेणुका देवीच्या यात्रेनंतर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भरत असलेल्या नावगोबा यात्रेप्रमाणेच ही परंपरा होती. या धार्मिक परंपरांचा आणि जागेच्या ऐतिहासिक महत्त्वाचा विचार करूनच या ठिकाणी श्री ज्योतिर्लिंग मंदिर उभारण्याचा संकल्प पुढे आला.Jotiba temple

१९६५-६६ साली मंदिर उभारणीची संकल्पना पुढे आली. माळमारुती एक्स्टेंशनचा भाग महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर मंदिरासाठी परवानगी मिळाली. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे यावेळी मंदिर उभारले जाऊ शकले नाही. १९९७-९८ मध्ये तत्कालीन नगरसेवक यल्लाप्पा मोहिते यांनी २५ गुंठे जागा मंदिरासाठी महानगरपालिकेकडून मंजूर करून घेतली.

यानंतर २००८ साली चव्हाट गल्लीतील शिवाजी किल्लेकर, अमर येळ्ळूरकर, विश्वास धुळाजी, अनंत जाधव, हणमंत ताशिलदार, दिगंबर पवार, प्रवीण जाधव, उत्तम नाकाडी, भाऊ नाईक, विश्वजित हसबे, किसन रेडेकर आदींसह अनेक मान्यवरांच्या पुढाकारातून २० सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या पुढाकाराने १० बाय १० आकारात गाभारा उभारण्यात आला आणि म्हैसूर येथे तयार केलेल्या श्री ज्योतिर्लिंग आणि श्री काळभैरव यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. २००८ पासून मंदिराचा विकास आणि विस्तार हळूहळू सुरू झाला. नागरिकांनी उदंड देणग्या देत भरभरून सहकार्य केले.

हे देवस्थान आता श्रद्धा आणि पर्यटनाचा केंद्रबिंदू बनू लागले आहे. केवळ देवदर्शन आणि धार्मिक विधींसाठी नाही तर देवस्थानाच्या देणगीच्या स्वरूपात जमा झालेल्या निधीचा समाजासाठी उपयोग व्हावा यासाठी जालगार मारुती मंदिर ट्रस्टला जागा मंजूर करून सर्वसोयींनीयुक्त सुसज्ज कार्यालय सुरू करण्यात आले. लाखोंच्या खर्चाच्या तुलनेत हे कार्यालय सामान्य नागरिकांना फक्त २५००० रुपयांत भाड्याने उपलब्ध करून देण्यात येते.Chaitra yatra

आज शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना, ट्रस्टच्या माध्यमातून नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात येतो. देवस्थान आणि जालगार ट्रस्टचे कार्य केवळ धार्मिकच नव्हे तर समाजाभिमुखतेचे प्रतीक ठरते. दोन्ही ट्रस्टच्या माध्यमातून मराठा समाजासाठी विशेष उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालय हे एक महत्त्वाचे उदाहरण ठरते. नाममात्र दरात विवाह आणि अन्य शुभकार्य पार पाडता यावे यासाठी हे कार्यालय उभारण्यात आले आहे. अलीकडच्या काळात लग्न, घरगुती कार्यक्रम, समारंभ, सोहळे हे केवळ भंपकबाजीचे कारण ठरत असताना अनेक मध्यमवर्गीय, सर्वसामान्य कुटुंबीय यात भरडले जात आहेत. प्रवाहासोबतच अनेक कार्यालये, इव्हेन्ट मॅनेजमेंट संस्था देखील दरवाढीच्या मागे धडपडत आहेत. मात्र अशा वेळी मराठा समाजातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला आधार म्हणून जालगार ट्रस्ट आणि ज्योतिर्लिंग ट्रस्टने पुढाकार घेत चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंदिर मंगल कार्यालय अत्यंत माफक दरात उपलब्ध केले आहे, हि अत्यंत कौतूकास्पद बाब आहे.

बेळगावमधील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान ही केवळ एक धार्मिक वास्तू न राहता, ती सामाजिक बांधिलकी जपणारी, पारंपरिक श्रद्धांना आधुनिक उपयोजनाशी जोडणारी एक प्रेरणास्थळ ठरली आहे. श्री जालगार मारुती मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून उभारलेले माफक दरातील मंगल कार्यालय, सर्वसामान्यांसाठी सुरू असलेले उपक्रम, आणि मंदिर परिसराच्या विकासासाठी दिलेले योगदान हे सर्व या संस्थेच्या समाजाभिमुख दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे. भाविकांच्या श्रद्धेची पुर्तता आणि समाजसेवेची जाणीव या दोन गोष्टींचा समतोल राखत हे देवस्थान आज बेळगाव शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.