बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या गणाचारी गल्लीतील सामुदायिक भवनाच्या बांधकामास खाटीक समाजाने संपूर्ण पाठिंबा दिला असून नुकत्याच झालेल्या सर्व्हेद्वारे जागेची स्पष्टता झाल्यानंतर समाजाने कोणताही वाद किंवा आक्षेप नसल्याचे जाहीर केले आहे.
गणाचारी गल्लीतील बकरी मंडई येथे 11 मार्च 2025 रोजी महानगरपालिकेचे अधिकारी, सीटी सर्व्हे अधिकारी आणि खाटीक समाजाच्या उपस्थितीत सर्व्हे प्रक्रिया पार पडली. या सर्व्हेद्वारे सर्व्हे नंबर 4017/1B/1, 4017/2 आणि 4017/3B च्या सीमा निश्चित करण्यात आल्या.
यावेळी झालेल्या बैठकीत खाटीक समाजाने मंजूर सामुदायिक भवनाच्या बांधकामासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.
समाजाने स्पष्ट केले की, या जागेसंदर्भात कोणताही वाद किंवा आक्षेप नाही आणि लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
गणाचारी गल्लीतील रहिवाशांच्या आणि समाजाच्या हितासाठी हे सामुदायिक भवन लवकरात लवकर उभारावे, अशी विनंती खाटीक समाजाने महानगरपालिकेला केली आहे.