बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेतील काही नगरसेवकांची वाढती दादागिरी आणि काल एका नगरसेवकाने महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांच्याशी केलेल्या हमरातुमरीच्या निषेधार्थ महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी आज गुरुवारी सकाळी कामावर बहिष्कार टाकून महापालिका कार्यालय प्रवेशद्वारात धरणे आंदोलन केले.
ई -आस्थी नोंदणी बाबतच्या एका कामासंदर्भात बेळगाव महापालिकेतील अपक्ष नगरसेवक रियाज किल्लेदार व महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांच्यात काल बुधवारी जोरदार हमरीतुमरी झाली होती. यापूर्वी देखील काही नगरसेवकांकडून महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे प्रकार घडले असल्यामुळे कालच्या घटनेच्या निषेधार्थ समस्त मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आपल्या कामावर बहिष्कार टाकला.
आक्रमक झालेल्या या सर्वांनी त्यानंतर महापालिका इमारत प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर ठिय्या मारून धरणे आंदोलन करण्याद्वारे निषेध नोंदवला. तसेच संबंधित नगरसेवकांची मनमानी आणि त्यांच्या दादागिरीला लगाम घालण्यात यावा अशी जोरदार मागणीही केली. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांनी कशाप्रकारे कांही नगरसेवकांकडून पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो याची माहिती दिली.
एखाद्या कामाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व पुरावे सादर न करता थोडक्यात नियम उल्लंघन करून आम्ही त्यांचे काम करून द्यावे असा त्या नगरसेवकांचा आग्रह असतो.
हा प्रकार फक्त माझ्या बाबतीतच घडला नसून यापूर्वी येथील अनेकांच्या बाबतीत घडला आहे असे सांगून संबंधित नगरसेवकांच्या अरेरावीला तात्काळ आळा घातला गेला पाहिजे अशी मागणी अनिशेट्टर यांनी केली.