Friday, November 14, 2025

/

महाकुंभ मेळ्यासाठी पूर्व नियोजन अत्यावश्यक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात गर्दीमुळे भाविकांमध्ये गैरसमज पसरत आहे. प्रत्यक्षात फक्त शाही स्नानाच्या वेळी मोठी गर्दी होत असून इतरवेळी ती नियंत्रणात आहे. त्यामुळे भाविकांनी घाबरून न जाता योग्य नियोजन करून कुंभमेळ्याला यावे, असे आवाहन बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले यांनी केले आहे.

गेल्या दोन दिवसापासून कपिल भोसले हे प्रयागराज येथे आहेत बेळगाव लाईव्ह च्या विनंतीवरून त्यांनी खास व्हिडिओ बनवून देत संपूर्ण माहिती दिली आहे.महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज येथे दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. परंतु, फक्त शाही स्नानाच्या वेळी गर्दीचे प्रमाण मोठे असते.

या पार्श्वभूमीवर, बेळगावच्या भाविकांनी गैरसमज करून न घेता व्यवस्थित पूर्व नियोजन करून यात्रेचे नियोजन करावे, असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी आज प्रयागराज येथून थेट संवाद साधत महाकुंभच्या व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली.

 belgaum

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात गर्दीमुळे काही ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये बेळगावच्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे अनेक भाविकांनी नियोजित यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात फक्त शाही स्नानाच्या दिवशीच गर्दीचा ताण वाढत असून इतरवेळी ती नियंत्रणात आहे. भाविकांनी शाही स्नानाचा कालावधी वगळून यात्रेचे नियोजन करावे, असा सल्ला कपिल भोसले यांनी दिला आहे.

कुंभमेळ्यात एकूण २२ सेक्टर असून २० ते २५ किमी लांबीच्या घाटावर भाविकांसाठी प्रशासनाने स्नानाची विशेष व्यवस्था केली आहे. प्रशासनाच्या नियमानुसार, भाविकांनी वेगवेगळ्या घाटांवर स्नान केल्यास चेंगराचेंगरीच्या घटनांना आळा बसू शकतो.Kumbha mela ground report

शाही स्नानाच्या वेळी गंगा, यमुना आणि सरस्वती संगमावर विशेष गर्दी होत असते. मात्र, प्रशासनाने या ठिकाणी बोटीच्या माध्यमातून भाविकांची वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बोटींचे भाडे २०० ते १००० रुपयांपर्यंत असून, इच्छुक भाविक पूजाअर्चेची सुविधाही घेऊ शकतात.

भाविकांनी महाकुंभ यात्रेसाठी फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगल मॅपच्या माध्यमातून माहिती घेऊन पूर्वनियोजन करावे. प्रयागराजमध्ये निवासाची व्यवस्थाही विविध दरांमध्ये उपलब्ध आहे. सहारानगर परिसरात १ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत भाड्याच्या खोल्या आरक्षित करता येतात. त्यामुळे येथील गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी भाविकांनी योग्य नियोजन करावे.

महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने काही ठिकाणी फसवणुकीच्या घटना देखील घडत आहेत. त्यामुळे भाविकांनी सावध राहून कोणत्याही सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी दोन-तीन ठिकाणी चौकशी करावी, असेही भोसले यांनी स्पष्ट केले. तसेच, १४४ वर्षांनंतर होणाऱ्या या महाकुंभ मेळ्याचा लाभ घेताना पूर्व नियोजन करून यात्रेचे योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.