Monday, April 21, 2025

/

तुंबलेल्या गटारीची पाहणी उद्यापासून स्वच्छता

 belgaum

बेळगाव लाईव्ह :चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्यामुळे मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या शहापूर येथील बॅरिस्टर नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या तुंबलेल्या गटारी संदर्भात नगरसेवक रवी साळुंके यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत स्मार्ट सिटी विभागाच्या अभियंत्यांनी आज शुक्रवारी सकाळी सदर गटारीची पाहणी केली. तसेच उद्या शनिवारी गटार स्वच्छतेचे काम हाती घेतले जाईल, असे ठोस आश्वासन दिले आहे.

शहापूर येथील बॅरिस्टर नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कल दरम्यान बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने हॉकर्स झोन तयार केला असून त्यामध्ये दुकान गाळे बांधण्यात आले आहेत. शिवाय रस्त्याच्या एका बाजूला मोठी गटार बांधण्यात आली आहे. त्या गटारीचे बांधकाम योग्य पद्धतीने न झाल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे तेथील विहिरी प्रदूषित झाल्या आहेत.

या संदर्भात तेथील रहिवासी तसेच नगरसेवक रवी साळुंके यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. मात्र ती गटार स्मार्ट सिटी विभागाने बांधली असल्यामुळे महापालिकेने त्यांना एका पत्राद्वारे गटारीची समस्या सोडविण्यास सांगितले होते. प्रत्युत्तरादाखल गटारीचे बांधकाम योग्य पद्धतीने झाल्याचा व गटारी प्लास्टिक, टाकाऊ भाजीपाला, चिकन वेस्ट, डेब्रिस आदी टाकल्याने सांडपाण्याचा निचरा होत नसल्याचा ठपका स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी ठेवला होता. तसेच तेथे सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य गटारीत पडल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे आपल्या पत्रात नमूद केले होते.City corp

या संदर्भात नगरसेवक रवी साळुंके यांनी काल गुरुवारी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका आफरीनबानू बळ्ळारी यांची भेट घेतली. तसेच कचरा किंवा डेब्रिस टाकल्याने समस्या उद्भवलेली नसून गटारीचे बांधकामच चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे गटार तुंबत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेंव्हा आफरीनबानू बळ्ळारी यांनी स्मार्ट सिटी अभियंत्यांना आपण त्वरित पाहणीसाठी पाठवू असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार स्मार्ट सिटीचे अभियंता अभिषेक व अन्य अधिकाऱ्यांसह मनपा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कनिष्ठ अभियंता शिल्पा हे आज शुक्रवारी सकाळी बॅरिस्टर नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कल रस्त्याच्या ठिकाणी दाखल झाले. महापालिका कर्मचाऱ्यांकरवी तेथील गटारीवरील काँक्रीटची अवजड अच्छादनं हटवून संपूर्ण गटार खुली करण्यात आल्यानंतर नगरसेवक रवी साळुंके यांनी गटारात प्रचंड प्रमाणात साचलेला कचरा व घाण उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

गटाराची संपूर्ण पाहणी केल्यानंतर स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उद्या शनिवारी सदर गटार स्वच्छ केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. या पद्धतीने नगरसेवक रवी साळुंके यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.