बेळगाव लाईव्ह : जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही कार्य करणे अवघड असले तरीही त्यातून मार्ग काढून यश साधता येते… हि गोष्ट हलगा येथील युवा मूर्तिकार सुशांत लोहार यांच्याकडे पाहिल्यास आपल्याला जाणवते.. वयाच्या १९ व्या वर्षापासूनच मूर्तिकला जपणारा युवा कलाकार आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणेशोत्सव मूर्ती देखील उत्तम पद्धतीने साकारतो.
कोल्हापूर येथील कलामंदिर महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलेल्या सुशांत लोहार या युवकाने महाविद्यालयीन जीवनात सुट्टीच्या वेळेत मूर्तिकला सुरु केली. ती आजतागायत सुरूच आहे. हलगा येथे वास्तव्यास असणारा सुशांत हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढला असून लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने आई आणि भावासोबत राहून आपली कला आणि शिक्षण दोन्ही गोष्टींचा ताळमेळ त्याने राखला आहे. मोठा भाऊ सेंट्रिंग कामगार तर आई आशा कार्यकर्ती.. अशा प्रवासात आपल्या तुपुंज्या पगारातून आईने सुशांतला फाईन आर्ट्स शिक्षण शिकविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. याचेच फळ आज सुशांतला मिळत असून हलगा येथील एकाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती साकारणारा हा युवा कलाकार आज ६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मुर्त्या साकारत आहे, हे विशेष..
सुशांत लोहार समवेत त्याच्या मित्रमंडळींचीही त्याला साथ लाभत असून शाडूपासून मूर्ती बनविणे हि कला त्याला जास्त जवळची वाटते. सध्या हलगा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची एक मूर्ती आणि बस्तवाड येथील चार तर कालखांब येथील एका गणेशोत्सव मंडळाची मूर्ती सुशांत लोहार आणि त्याच्या सहकार्याने साकारली आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्ह शी बोलताना त्याने सांगितले, साधारण ५ ते ६ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या शाडू मूर्ती बनविता येत नाहीत. यासाठी पीओपीचा वापर करावा लागतो. मात्र पर्यावरण प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी लक्षात घेता पुढील काळात आपण शाडूपासून अधिक उंचीच्या मूर्ती कशा बनविता येतील यावर अभ्यास करणार आहे.
गेल्या १९ वर्षांपासून आपण हे मूर्तिकाम करत असून आपल्याला आपल्या कुटुंबियांसमवेत मित्रमंडळींचाही मोठा पाठिंबा लाभला आहे. प्रतिकूल परिस्थीतूनही आपली कला जपत यशाकडे वाटचाल करणाऱ्या युवा मूर्तिकाराला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.