बेळगाव लाईव्ह:नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील सोनालिम आणि दूधसागर रेल्वे स्थानकांदरम्यान आज गुरुवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास रेल्वे मालगाडीचा डबा (वॅगन) रुळावरून घसरल्याची घटना घडली असून त्यामुळे या मार्गावरील प्रवासी रेल्वे गाड्या वळवण्यात येण्याबरोबरच अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
अन्य मार्गाने वळवण्यात आलेल्या आणि अंशतः रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. 1) रेल्वे क्र. 12779 वास्को द गामा -हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसचा 12 सप्टेंबर 2024 सुरू होणारा प्रवास मडगाव, रोहा, पनवेल, पुणे, दौंड चोर्ड लाइन आणि मनमाड स्थानकांद्वारे वळवण्यात आला आहे.
2) रेल्वे क्र. 18047 शालीमार -वास्को द गामा एक्स्प्रेसचा प्रवास 10 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झालेला लोंढा स्थानकावर अल्पावधीसाठी थांबेल आणि लोंढा -वास्को द गामा स्थानकांदरम्यान अंशत: रद्द करण्यात आला आहे. 3) रेल्वे क्र. 18048 वास्को द गामा -शालिमार एक्स्प्रेसचा 13 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणारा प्रवास वास्को द गामा ऐवजी एसएसएस हुबळी येथून प्रारंभ होईल. ही रेल्वे वास्को द गामा -एसएसएस हुबळी स्थानकांदरम्यान अंशतः रद्द राहील.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी लोंढा स्थानकावर रेल्वे क्र. 18047 च्या अंदाजे 1,100 प्रवाशांसाठी जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लोंढा येथे अडकलेल्या प्रवाशांना नेण्यासाठी 25 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
रेल्वे वाहतूक पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी वास्को द गामा येथून एक अपघात मदत रेल्वे घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. नैऋत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक, सहाय्यक सरव्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि पुनर्संचयन प्रगतीपथावर आहे.
यापुढील रेल्वे सेवेतील कोणताही बदल सूचित केला जाईल, असे हुबळी विभागाने कळविले आहे. दरम्यान, मालगाडीचा डबा रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे गोवा मार्गावरील रेल्वे वाहतूक तूर्तास विस्कळीत झाली आहे.