बेळगाव लाईव्ह : काही कथा या केवळ यशोगाथा नसतात, त्या संघर्ष, त्याग आणि जिद्दीचे जिवंत दस्तावेज असतात. खानापूर तालुक्यातील दुर्गम बस्तवाड गावातील परशराम (प्रशांत) गुरव यांची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. जन्मत: आलेल्या अपंगत्वाला शरण न जाता, त्यालाच आपल्या यशाची पायरी बनवत त्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या कायदा परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत बस्तवाडसह करजगी, मेरडा, हलगा, किरहलशी, जांभेगाळी आणि देवराई या पंचक्रोशीतील पहिले वकील होण्याचा मान मिळवला आहे.
अपंगत्वाची सुरुवात, पण हार मानली नाही
डोंगर-दऱ्यांनी वेढलेल्या बस्तवाडमध्ये लक्ष्मण आणि भागिरथी गुरव यांच्या घरी परशराम यांचा जन्म झाला. बालपणीच डाव्या पायाला पोलिओ झाला आणि आयुष्याने पहिली मोठी परीक्षा घेतली. एका गरीब कुटुंबातील मुलासाठी ही अडचण मोठी होती; पण त्याहून मोठी होती त्याच्या आई-वडिलांची जिद्द.
वडील लक्ष्मण गुरव ट्रकवर हमाल म्हणून काम करीत. दिवसभर कष्ट करूनही मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कधी तडजोड केली नाही. आई भागिरथी गुरव यांनी अभावातही संस्कारांची श्रीमंती जपली. मुलगा चालण्यात कमी पडत होता, पण स्वप्न पाहण्यात कधी कमी पडू दिले नाही.
“तुझ्या मुलाला वकील कर!”
परशराम यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते कल्लाप्पा मष्णे पाटील यांनी लक्ष्मण गुरव यांना दिलेला सल्ला – “तुझ्या या मुलाला वकील कर!”
नंतर आणखी एका प्रसंगी ज्येष्ठ उद्योजक कै. एन. एस. प्रभू यांनीही त्याच आशयाचे शब्द उच्चारले. त्या दोन वाक्यांनी एका अपंग मुलाच्या मनात मोठे स्वप्न रुजले – वकील होण्याचे.
शिक्षणासाठी संघर्षाची पराकाष्ठा
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परशराम यांनी अनेक भूमिका निभावल्या. हॉटेलमध्ये काम केले, मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी केली, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून भटकले, मजुरी केली, शिक्षक आणि प्राध्यापक म्हणूनही काम केले.
दरम्यान शिक्षणाची वाट मात्र सुरूच ठेवली. त्यांनी बी.ए., एम.ए. (हिंदी), एम.एस.डब्ल्यू., संगणक डिप्लोमा, मराठी व इंग्रजी टायपिंग अशा अनेक शैक्षणिक पात्रता मिळवल्या. नोकरी आणि अभ्यास यांचा समतोल राखत अखेर कायद्याची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली.

पत्नीचा विश्वास, कुटुंबाची साथ
आज परशराम गुरव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रवासात पत्नी प्राची गुरव यांची साथ मोठी ठरली. संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी परशराम यांच्या स्वप्नांवरचा विश्वास जपला.
त्यांचा मुलगा पार्थ हा आता या संघर्षमय परंपरेचा वारसदार आहे. तर भाऊ संतोष गुरव यांनीही बांधकाम व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
ही फक्त यशोगाथा नाही…
परशराम गुरव यांची कथा म्हणजे—
- हमाल बापाच्या घामाची कथा,
- आईच्या त्यागाची कथा,
- भावाच्या पाठबळाची कथा,
- पत्नीच्या विश्वासाची कथा,
- आणि अपंगत्वावर मात करणाऱ्या जिद्दीची कथा.
ज्यांना परिस्थिती, गरिबी किंवा नशीब यांची कारणे पुढे करून स्वप्ने सोडून द्यावीशी वाटतात, त्यांच्यासाठी परशराम गुरव हे जिवंत उत्तर आहेत.
एका पायात पोलिओ असला तरी मनात हिमालयाएवढी ताकद असेल, तर कोणतेही स्वप्न अशक्य राहत नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.आज ते केवळ शासकीय अधिकारी नाहीत, तर वकील आहेत. आणि त्यांचे पुढील ध्येय आहे – एम.फिल. आणि पीएच.डी. पूर्ण करणे.परशराम गुरव हे नाव आता एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही; ते जिद्द, चिकाटी आणि स्वप्नपूर्तीचे प्रतीक बनले आहे.




