Thursday, October 10, 2024

/

दोन दिवस चालणाऱ्या विसर्जन मिरवणुकीमुळे रीती-रिवाज आणि संस्कृतीला फाटा!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष  : श्री गणेशाला विघ्नहर्ता असे संबोधले जाते. अनेक विघ्ने दूर करणारा गणराया मात्र विसर्जन मिरवणुकीमुळे स्वतःच विघ्नाला सामोरे जात आहे कि काय? असा उद्विग्न प्रश्न बेळगावमध्ये पार पडलेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर उभा राहिला आहे. २०२४ सालची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक तब्बल ३० तास सुरु होती. पंचांग, मुहूर्त, विधी, रीतिरिवाज, संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी प्रत्येकजण श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करतो. मात्र या सर्वच गोष्टींना फाटा देऊन मंडळांच्या आणि गणेशभक्तांच्या चढाओढीच्या स्पर्धेमुळे गणेशोत्सवाच्या मूळ हेतूचाच कडेलोट करण्यात येत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून येत आहे.

दोन महामंडळे कार्यरत असूनही ढिसाळ नियोजन!
शहरात सध्या मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळासह लोकमान्य गणेशोत्सव महामंडळ देखील कार्यरत आहे. या दोन्ही महामंडळांसह प्रशासकीय पातळीवर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सल्ला – सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र गणेशोत्सव मंडळांनी याकडे सपशेल दुर्लक्ष करत नियम आणि सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. परिणामी याचा फटका विसर्जन मिरवणुकीदरम्यान दिसून आला.

पितृपक्षपंधरवाड्यात गणेश मूर्तींचे विसर्जन!
अनंतचतुर्दशी नंतर यंदा लागलीच पितृपक्ष पंधरवडा सुरु झाला. दरवर्षी अनंतचतुर्दशीनंतर अनेक ठिकाणी कर पाळली जाते. गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असल्याने हा सण धार्मिक रितीरिवाजानुसार पार पाडणे आवश्यक आहे. परंतु गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा आणि आपल्याच मंडळाची मूर्ती सर्वात शेवटी विसर्जन करण्यासाठी सुरु असलेली चढाओढ यामुळे हि मिरवणूक लांबली. यामुळे मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना याही गोष्टींचा विचार आवर्जून करणे गरजेचे आहे.

गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात नियम लादून देखील मंडळांनी फिरवली पाठ!

शहरात कपिलेश्वर देवस्थानाजवळ दोनच विसर्जन तलाव आहेत. दरवर्षी या तलावात केवळ शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन होते. मात्र भव्य मिरवणुकीच्या दृष्टिकोनातून अलीकडे उपनगरासह तालुक्यातील काही भागातील गणेशमूर्ती देखील मिरवणुकीत सहभागी होत असल्याने तब्बल ३८० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामुळे यंदाची मिरवणूक लांबली. शिवाय विसर्जनासाठी तलाव अपुरे पडत आहेत. काही वर्षांपूर्वी बेळगावमध्ये उंच गणेशमूर्तींमुळे अनुचित प्रकार घडून दुर्घटनांना सामोरे जावे लागले आहे. या अनुषंगाने गणेशमूर्तींच्या उंची संदर्भात प्रशासन दरवर्षी गणेशोत्सव मंडळांना अटी घालून देते. मात्र गणेशोत्सव मंडळांमध्ये लागलेल्या स्पर्धेमुळे यंदाही गणेश मूर्ती १२ ते १५ फूट आणि त्याहून अधिक उंचीच्या निदर्शनात आल्या. हि बाब लक्षात घेता तलावांची अतिरिक्त खुदाई किंवा नवीन तलावाची निर्मिती करणे गरजेचे आहे.

मिरवणुकीची सुरुवात वेळेत पण, मिरवणुकीतील बेशिस्त विलंबाला ठरली कारणीभूत!
विसर्जन मिरवणूक वेळेत सुरु करून वेळेत संपविण्यासाठी प्रशासन आणि पोलीस विभागाने आधीच आवाहन केले होते. विसर्जन मिरवणूक दुपारी ३.३० वाजताच सुरु झाली. यानुसार सर्वप्रथम माळी गल्लीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. मात्र अधिकृत रित्या सायंकाळी ६ वाजताच मिरवणूक सुरु झाल्याने आणि गणेशमूर्ती मिरवणुकीत दाखल होण्यास सातत्य नसल्याने अखेर विसर्जन मिरवणूक बुधवारी मध्यरात्री १.०० वाजता महानगरपालिकेच्या श्री मूर्तीच्या विसर्जनानंतर संपली.

गणेशभक्ताचा मृत्यू होऊनही गांभीर्य नाही!
कपिलेश्वर उड्डाणपुलावर गणेशमूर्ती विराजमान असलेल्या ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरखाली चिरडून एका गणेशभक्ताचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी लगबग करणे गरजेचे होते. मात्र विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतरदेखील मूर्ती विसर्जनासाठी कोणत्याही गणेशोत्सव मंडळाने तत्परता दाखविली नाही. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास हि घटना घडली. मात्र यानंतर देखील १२ ते १३ तास सलग धुमधडाक्यात विसर्जन मिरवणूक सुरु राहिली, या गोष्टीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.Ganesh

सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वचजण वेठीस
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी गणेश चतुर्थीच्या आधीपासूनच पोलीस कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, हेस्कॉम कर्मचारी व्यस्त होते. विसर्जन मिरवणुकीसाठी अधिक कुमक मागवून अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र विसर्जन मिरवणूक तब्बल ३० तास चालल्याने सर्वच जण ताटकळत उभे राहिले. डॉल्बी, वाद्यांच्या सलग ३० तासांच्या आवाजात विसर्जन मिरवणूक मार्गावरील नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागला. मिरवणूक मार्गावर अनेक रुग्णालये आहेत. मात्र याचेही भान जपण्यात आले नाही. या मार्गावर असणारे व्यावसायिक, दुकानदार, छोटे व्यापारी यांनाही मंगळवार आणि बुधवार हे दोन्ही दिवस व्यवसाय बंद ठेवावे लागले. शिवाय स्वच्छता कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली.

विधायक उत्सव साजरा करण्याची गरज!
विसर्जन मिरवणुकीतील या सर्व गोष्टींचा विचार करून पुढील वर्षी या सर्व गोष्टींना आळा घालून गणेशोत्सव विधायक स्वरूपात साजरा केला जावा यासाठी प्रशासन, दोन्ही गणेशोत्सव महामंडळांनी गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधून चर्चा करून योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. काही गणेशोत्सव मंडळांनी अटी – नियमांना मंजुरी न दिल्यास अशा मंडळांवर कारवाई करण्याची गरज आहे. आडमुठे धोरण अवलंबणाऱ्या मंडळांना शिस्तीचे पालन करण्यासाठी कडक आदेश देणे गरजेचे आहे. ज्या मूळ उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली तो उद्देश आणि हेतू जपून सार्वजनिक गणेशोत्सवाला विधायक स्वरूप मिळवून देणे नितांत गरजेचे आहे.

पुण्यात सार्वजनिक गणेशोस्तव सुरू झाल्यानंतर लोकमान्य टिळक यांच्या उपस्थितीत बेळगावात गणेशोस्तव सुरू करण्यात आला. त्यामुळे बेळगावच्या उत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. या उत्सवात विधायक कार्यक्रम राबवून बेळगावचा लौकिक कायम राखणे आजच्या पिढीचे कर्तव्य आहे. पण विसर्जन मिरवणूक 30 ते 32 तास लांबणे, त्यामध्ये सुसूत्रता नसणे ही लाजिरवाणी बाब आहे. आपल्याकडे असलेल्या विसर्जन व्यवस्थेच्या हिशोबाने मूर्ती करणे, लोकांना त्रास होणार नाही, सर्वांना विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेता यावा, असे नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा एका ध्येयाने सुरू झालेल्या या उत्सवाच्या मिरवणुकीला ओंगळवाणे स्वरूप येण्याची भीती जाणकार लोकांतून व्यक्त होत आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.