Friday, September 20, 2024

/

फादर एडी स्मृती आं. शा. फुटबॉल स्पर्धेला 9 रोजी प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह:पोलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाइड आणि सेंट पॉल हायस्कूल यांच्यातर्फे आयोजित 56 वी फादर एडी स्मृती 17 वर्षाखालील मुलांची आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा येत्या सोमवार दि. 9 ते रविवार दि. 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पोलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाइडचे अध्यक्ष डाॅ. माधव प्रभू यांनी दिली.

कॅम्प येथील सेंटपॉल्स हायस्कूलमध्ये आज सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. डॉ. माधव प्रभू म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाची 56 वी फादर एडी स्मृती आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा येत्या 9 ते 15 सप्टेंबर या कालावधीत होणार असून ही बेळगावातील सर्वात जुनी आंतर शालेय फुटबॉल स्पर्धा आहे.

या स्पर्धेला बेळगावातील फुटबॉलची रणजी ट्रॉफी स्पर्धा म्हटले जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात कोणतीच आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा होत नाही. यंदा आमच्या या स्पर्धेला निप्पाणीकर परिवाराचे सहकार्य लाभले असून बिग व्हेंचर म्हणजे निशा छाब्रिया यांच्या स्मरणार्थ संपूर्ण स्पर्धा आणि महिला फुटबॉल संघाचा प्रदर्शनीय सामना खेळवणार आहोत.

यंदा या स्पर्धेत बेळगाव मधील 26 शालेय संघांचा सहभाग आहे. सध्या ही स्पर्धा बेळगाव शहर मर्यादित आहे. स्पर्धेच्या प्रारंभी महिला अर्थात मुलींचा जो प्रदर्शनीय सामना खेळविला जाणार आहे त्या सामन्यास प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित राहणार आहेत. तसेच स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास शहर पोलीस आयुक्त आणि शहराचे आमदार असिफ सेठ यांना निमंत्रित करण्यात आले आहे.Father ad

भव्य प्रमाणात होणाऱ्या या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षीस हे पुरस्कृत करण्यात आली आहेत. बक्षीसांमध्ये गोल्डन ग्लाउज, गोल्डन शूज आदींचाही समावेश असणार आहे अशी माहिती देण्याबरोबरच ही स्पर्धा म्हणजे फुटबॉल प्रेमींसाठी पर्वणी असणार असून क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद लुटावा, असे आवाहन डॉ. माधव प्रभू यांनी केले.

पत्रकार परिषदेपूर्वी फादर एडी स्मृती आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी बक्षीसा दाखल पुरस्कृत करण्यात आलेल्या आकर्षक करंडक आणि चषकांचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. माधव प्रभू यांच्यासह सेंट पॉल हायस्कूलचे प्राचार्य फादर सायमन फर्नांडिस, उपप्राचार्य फादर ॲलनड्रॉ डकोस्टा, पोलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाइडचे उपाध्यक्ष परेश मुरकुटे, क्रीडा समन्वयक अमित पाटील आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.