बेळगाव लाईव्ह:शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी.बी. रोड पर्यंतच्या रस्त्यासाठी जनतेचा पैसा खर्च झाला असल्यामुळे 20 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे प्रकरण संबंधित जमीन मूळ मालकाला परत करून थांबणारे नाही, असे मत माजी आमदार रमेश कुडची यांनी व्यक्त केले.
बेळगाव शहरात आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार रमेश कुडची यांनी सांगितले की, शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पीबी रोड पर्यंतच्या रस्त्यासंदर्भात 20 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई प्रकरणी महापालिका आयुक्तांनी उच्च न्यायालयासमोर नुकसान भरपाई एवजी जमीन मालकांना त्यांची जमीन परत करण्याचे मान्य केले आहे.
त्यावेळी आम्हाला आमची जमीन परत मिळाली असली तरी त्या जमिनीचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई कोण देणार? अशी विचारणा जमीन मालक बाळासाहेब पाटील यांच्या वकिलांनी केली. त्यावेळी माननीय न्यायाधीशांनी त्या नुकसान भरपाईसाठी वेगळी याचिका दाखल करा आम्ही त्याचा विचार करू असे निर्देश पाटील यांच्या वकील यांना दिले. तसेच महापालिका आयुक्तांना 5 लाख रुपये दंड करण्याबरोबरच त्यांची पगार वाढ आणि बढती केली जाऊ नये असा निर्णय दिला. मात्र महापालिकेच्या वकिलांनी केलेल्या विनंतीनंतर त्या संदर्भातील आदेश येत्या सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.
दरम्यान आता येत्या सोमवारपर्यंत महापालिका आयुक्त आणि भूसंपादन खात्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी समक्ष जाऊन संबंधित जमीन मालकांना त्यांची जागा परत करायला हवी आणि त्याचा अहवाल आपल्यासमोर सादर करावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार असून संबंधित जमिनीची नुकसान भरपाई बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने दिली पाहिजे असे आमचे मत आहे, असे कुडची यांनी सांगितले.
हे प्रकरण इथेच थांबत नाही कारण बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने विकास कामांवर खर्च केलेला पैसा हा जनतेचा आहे. त्यामुळे शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी.बी. रोड पर्यंतच्या रस्त्यासारख्या बेकायदेशीर विकास कामांवर जो जनतेचा पैसा खर्च केला जात आहे त्याचे काय? यावर देखील येत्या सोमवारी बाळासाहेब पाटील यांचे वकील युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे नुकसान भरपाईचे हे प्रकरण एकंदर न थांबणारे आहे असे मत माजी आमदार, रमेश कुडची यांनी शेवटी व्यक्त केले.