बेळगाव लाईव्ह :नीट परीक्षा आणि त्या संदर्भातील कथित घोटाळ्याने सारा देशच हादरला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन वाद सुरू आहे. अनेकांना या परीक्षेत मिळालेले गुण वादाच्या भोवऱ्यात अडकले असून अशाच एका मुलीला पडलेल्या गुणांबद्दल संशय व्यक्त करण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेत तिने परीक्षा दिलेल्या बेळगाव येथील परीक्षा केंद्राचा मुद्दा पुढे आला आहे. यामुळे आता नीट परीक्षेच्या घोटाळ्यात बेळगाव येथील परीक्षा केंद्रही सर्वोच्च न्यायालयाच्या रडारवर आले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गुजरात येथील एका मुलीने कर्नाटकातील बेळगाव मध्ये असलेल्या परीक्षा केंद्रावर नीट ची परीक्षा दिली होती. त्यामध्ये तिला 705 गुण मिळाले. दरम्यान याचिकाकर्त्याने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सवाल उपस्थित केला असून बारावी मध्ये नापास झालेल्या त्या मुलीला नीट मध्ये 705 गुण कसे मिळाले. असा याचिकाकर्त्याचा प्रश्न आहे.
या संदर्भातील आढावा घेताना संबंधित परीक्षा केंद्राचा सक्सेस दर काय आहे असा प्रश्न सरन्यायमूर्तींनी विचारला असता, त्याचे उत्तर केवळ सहा टक्के असे आले आहे. यामुळे त्या परीक्षा केंद्रात परीक्षा दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी फक्त सहा टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये त्या मुलीचा समावेश आहे.
गुजरात मधील त्या मुलीने बेळगाव येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली ती त्यात 705 गुण मिळवून उत्तीर्ण झाली, मात्र बारावी मध्ये उत्तीर्ण झाली नसल्यामुळे परीक्षा केंद्रावर काही गैरप्रकार झाला का? अशा पद्धतीचा मुद्दा उपस्थित झाला असून त्यामुळे हे परीक्षा केंद्र चर्चेत आले आहे.
आता यापुढील न्यायालयीन चौकशीत जे काही सिद्ध होणार आहे त्याकडे संपूर्ण कर्नाटकाचे आणि बेळगाव जिल्ह्याचेही लक्ष लागून राहणार आहे. संबंधित परीक्षा केंद्र नेमके कुठे होते आणि तेथे कोणते गैरप्रकार झाले याची चौकशी आता न्यायालयीन आदेशानुसार होणार असून त्यापुढे एकंदर कार्यवाही होणार आहे.
गुजरात मधून बेळगावला येऊन परीक्षा दिलेल्या त्या मुलीने 705 गुण कसे मिळवले? या संदर्भातील मुद्दा आता देशपातळीवर चर्चेत आला आहे. न्यायालयीन कामकाजा संदर्भात बातमी देणाऱ्या लाईव्ह लॉ या वेबसाईटनेही या संदर्भात भाष्य केले असून यामुळे बेळगाव येथील परीक्षा केंद्राची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.
# That exam center in Belgaum is also on the radar in the #NEET #exam scam.#belgaum live news neet exam scam belgaum exam center on sc #radar