Thursday, December 5, 2024

/

बळ्ळारी नाल्यासंदर्भात डीसींना भेटण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बळ्ळारी नाल्याची लवकरात लवकर स्वच्छता करून रुंदीकरण करण्याद्वारे चांगला विकास साधला जावा. या नाल्याला जोडणाऱ्या अन्य नाल्यांची साफसफाई केली जावी. तसेच यंदा या नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रामुख्याने भात पिकाचे झालेले नुकसान यासंदर्भात जिल्हाधिकारी (डीसी) आणि जिल्हा पालकमंत्री यांची भेट घेण्याचा निर्णय आज बेळगाव शहर परिसरातील शेतकऱ्यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

बळ्ळारी नाल्याच्या पुराच्या समस्येसंदर्भात वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये त्रस्त शेतकऱ्यांची आज बुधवारी सकाळी पुन्हा बैठक झाली. या बैठकीत प्रशासनाकडून बळ्ळारी नाल्याच्या पुराच्या समस्येचे निवारण करून निर्णायक लढा देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने येत्या सोमवारी 5 ऑगस्ट रोजी प्रथम जिल्हाधिकारी आणि त्यानंतर जिल्हा पालकमंत्र्यांची भेट घेणे.

या भेटीप्रसंगी यांच्यासमोर बळ्ळारी नाल्याची समस्या माडणे. या नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाचे जे अतोनात नुकसान झाले आहे त्याची माहिती देऊन नुकसान भरपाईची मागणी करणे. त्याचप्रमाणे स्वच्छतेसह अतिक्रमण हटवून नाल्याचा ताबडतोब विकास साधणे.

त्याबरोबरच त्याला जोडणाऱ्या अन्य लहान-मोठ्या नाल्यांची स्वच्छता करणे अशा मागण्या करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीस शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर, नारायण सावंत, अमोल देसाई, मनोहर हलगेकर, कीर्तीकुमार कुलकर्णी, रणजीत चव्हाण -पाटील आदी नेते मंडळींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

बैठकीनंतर बेळगाव लाईव्हला माहिती देताना शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, आजच्या आमच्या बैठकीमध्ये बळ्ळारी नाल्याचा विकास आणि या नाल्याच्या पुरामुळे होत असलेल्या शेत पिकाच्या नुकसानी संदर्भात येत्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला.Ballari nala

जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणेच जिल्हा पालकमंत्री यांची भेट घेण्याचेही ठरले आहे. या उभयतांशी सध्या बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे शेतजमिनी पाण्याखाली जाऊन भात पिकांचे जे प्रचंड नुकसान झाले आहे त्याबद्दल चर्चा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अतिक्रमण केल्यामुळे नाल्याचे पात्र अरुंद होऊन शेतजमिनी आणि धर्मवीर संभाजीनगर, मंगाईनगर वगैरे उपनगरांमध्ये निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे पीक व मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच जनजीवन विस्कळीत होत आहे. बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे आजपर्यंत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

यंदा आलेल्या पुरामुळे तर शेतकऱ्यांना आता रोप लावणीही करता येणार नाही. यासंदर्भात तसेच बळ्ळारी नालाचा गाळ काढून स्वच्छता आणि विकास केला जावा, नाल्याचे रुंदीकरण केले जावे. याखेरीज या नाल्याला जोडले गेलेले अन्य जे नाले आहेत, त्यांची देखील साफसफाई केली जावी. यासाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असे कोंडुसकर यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.