Monday, July 15, 2024

/

खासदार ‘या’ समस्या सोडविण्याकडे लक्ष देतील का?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराची व्याप्ती वाढली आहे. विकासाचा वेग जसजसा वाढत आहे त्याच गतीने शहरातील रहदारीदेखील वाढत आहे. रहदारी नियंत्रणासाठी मास्टर प्लॅन अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण झाले, उड्डाणपूल उभारले गेले.

मात्र अद्याप शहराचता वाहतुकीचा प्रश्न मात्र ‘जैसे थे’ आहे. शहरात ठिकठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले. मात्र या उड्डाणपुलाच्या परिसरातील समस्यांचा डोंगर मात्र वाढतच चालला आहे.

शहरात प्रामुख्याने मराठा मंदिर, कपिलेश्वर, खासबाग यासह टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वेगेटनजिकचा उड्डाणपूल असे उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. या उड्डाणपुलाच्या माध्यमातून शहराच्या रहदारीचा, वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा होती.

मात्र या उड्डाणपुलाच्या शेजारी, उड्डाणपुलावर जितक्या समस्या आहेत त्या समस्या पाहता वाहतुकीच्या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे. विशेषतः दुसऱ्या रेल्वेगेटनजीक देखील उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे. मात्र आधीच शहरात असलेल्या उड्डाणपुलाची अवस्था पाहता नव्या उड्डाणपुलाची तजवीज करून ते जनतेच्या पदरी पडेपर्यंत मोठी प्रतीक्षा करावी लागणार यात शंका नाही.

सध्या टिळकवाडी भागातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आहे. पहिल्या रेल्वेगेटनजीक घालण्यात आलेले बॅरिकेड्स, याच रेल्वे गेटजनजीक अशास्त्रीयपद्धतीने करण्यात आलेले सीडी वर्क यामुळे येथील रहदारीची समस्या दिवसागणिक जटील होत चालली आहे. तिथून पुढे दुसऱ्या रेल्वेगेटनजीक देखील असाच प्रकार पाहायला मिळत आहे.

सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, आटुक जागा, वाहनधारकांची कसरत आणि यातून निर्माण होणारी वादावादी हा प्रकार नेहमीचाच ठरलेला आहे. तिथून पुढे तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचे कामकाज एकाच बाजूने पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूचे कामकाज अर्धवट परिस्थितीत आहे. हे कामकाज कधी पूर्ण होणार? याबाबत नागरीकातून सातत्याने प्रश्नांची मालिका सुरु आहे. प्रसारमाध्यमांवर बातम्या झळकत आहेत. परंतु हे कामकाज सुरु करण्याचा मुहूर्त अद्याप मिळाला नसल्याने कामकाज ठप्प आहे.Second gate

मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिजची देखील अशीच अवस्था आहे. शहरातील सर्वात जुना उड्डाणपूल असणाऱ्या या उड्डाणपुलाचे कामकाज नव्याने करण्यात आले. ब्रिटिशांच्या काळापासून उभा असलेला हा उड्डाणपूल दशकं उलटून गेली तरी जितका जीर्ण झाला नव्हता तो नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या काही वर्षातच दयनीय झाला. या उड्डाणपुलावर पथदीपांची सोय नाही. यामुळे याठिकाणी आजवर अनेक अपघात घडले आहेत.

एकंदर शहरीकरणाच्या नावावर करण्यात आलेला विकास हा अर्धवट स्थितीतच असल्याने प्रशासनाच्या कार्यशैलीवर नागरिक ताशेरे ओढत आहेत. नागरिकांसाठी नियम, अटी, कायद्यांचा भडीमार करणाऱ्या प्रशासनाला नागरी सुविधा योग्य पद्धतीने पुरविण्यासाठी कधी जाग येईल? असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. तसेच नव्याने बेळगावच्या खासदारपदी विराजमान झालेले जगदीश शेट्टर बेळगावच्या या उड्डाणपुलांसंदर्भात कोणती भूमिका घेतील? कामकाज पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेऊन जनतेचे समाधान करतील का? असे प्रश्न जनतेतून उपस्थित करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.