Wednesday, September 11, 2024

/

रहदारी पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचे ताशेरे..

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील रहदारीच्या समस्या दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. वाहतूक कोंडी, जुन्या वाहनातून निघणारे धूर, यामुळे होणारे पर्यावरण प्रदूषण, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आणि गरजेच्या ठिकाणी रहदारी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे घडणारे अपघात, ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून इतरत्र वळविण्यात आलेली वाहतुक आणि नागरिकांना सोसावा लागणार याचा मनस्ताप, ठिकठिकाणी बंद पडलेली सिग्नल यंत्रणा यासारख्या अनेक कारणांमुळे बेळगावच्या रहदारीच्या समस्येत वाढ झाली आहे.

परंतु याकडे दुर्लक्ष करत रहदारी पोलीस विभाग केवळ ‘वसुली’ करण्यात गुंतले असल्याचे चित्र सध्या बेळगाव शहरासह उपनगराला जोडणाऱ्या रस्त्यांवर आडवळणावर थांबलेल्या रहदारी पोलिसांकडे पाहिल्यावर दिसून येत आहे!

टिळकवाडी काँग्रेस रोडनजीक आज अशाच पद्धतीने रहदारी पोलिसांचा ताफा नागरिकांना अडविण्यात व्यस्त असलेला दिसून आला. मात्र रहदारी पोलिसांच्या या मोहिमेमुळे नागरीकातून सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात येत असून टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेट नजीक लावण्यात आलेले बॅरिकेड्स हटविण्यात यावे, वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नल यंत्रणा सुरळीत करण्यात यावी, नको असलेल्या ठिकाणचे युटर्न बंद करून आवश्यक ठिकाणचे युटर्न सुरु करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

रहदारी पोलिसांकडून कधी वाहनांच्या कागदपत्रांसाठी, कधी हेल्मेटसाठी तर कधी एचएसआरपी नंबर प्लेट साठी किंवा कधी आणखी कुठल्या कारणासाठी नागरिकांना वेठीला धरले जाते. कोणत्या ना कोणत्या कारणावरून नागरिकांना दंड ठोठावला जातो. परंतु रहदारीच्या समस्येत भर घालणाऱ्या असुविधांकडे मात्र रहदारी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून सर्वसामान्य लोकांचा अशा कारणांमुळे गोंधळ उडत आहे.Traffic

सोशल मीडियाच्या माध्यमातून आता प्रत्येकजण समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळे रहदारी विभागाच्या या कारवाईवर तर अक्षरशः ताशेरे ओढले जात आहेत. सरकारकडून प्रत्येक गोष्टीचा कर वसूल केला जातो पण मूलभूत सुविधा का पुरविल्या जात नाहीत? रहदारीच्या मार्गातील अडथळे का दूर केले जात नाहीत? नागरिकांना जाणीवपूर्वक अशापद्धतीने अडकविले जाते का? असे प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत.

यामुळे रहदारी विभागाने सर्वप्रथम रहदारीसंदर्भातील सुविधांकडे अधिक लक्ष देऊन त्यानंतर नियमांच्या अंमलबजावणीसाठी पुढे यावे, असे आवाहन नागरीकातून करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.