बेळगाव लाईव्ह : खानापूर-लोंढा-अळणावर यादरम्यान धावणाऱ्या चालुक्य एक्स्प्रेमध्ये गुरुवारी थरारक प्रसंग घडला होता. माथेफिरूने केलेल्या चाकू हल्ल्यात उत्तर प्रदेशमधील एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला टीसीसह अन्य चौघे जण जखमी झाले.
या प्रकरणी आज बेळगाव जिल्हा रुग्णालयात डीआयजी शरणप्पा यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डीआयजी शरणप्पा यांनी मृत देवर्षी वर्मा याच्या कुटुंबियांना रेल्वे विभागाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले.
चालुक्य एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर रेल्वेप्रवासी हादरून गेले आहेत. पुदुच्चेरी-मुंबई चालुक्य एक्स्प्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका माथेफिरुने हे कृत्य केले आहे.
या घटनेनंतर चाकू हल्ला करणारा हल्लेखोर खानापूरजवळ रेल्वेतून उतरून निघून गेला आहे, अशी माहिती मिळाली आहे. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात यासंबंधी आरोपीवर भादंवि ३०२, ३०७, ३३२, ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधार्थ जीआरजी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सर्व जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी देवर्षी वर्मा या तरुणाच्या छातीत वर्मी घाव बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
रेल्वे विभागात कर्तव्य बजावणाऱ्या आरपीएफ पोलिसांची कुमक कमी असल्याचा मुद्दा या घटनेनंतर उजेडात आला असून राज्यात दररोज धावणाऱ्या सुमारे १४०० रेल्वे गाड्यांसाठी केवळ ८३० कर्मचारी कार्यरत असल्याचे डीआयजींनी सांगितले. गुरुवारी घडलेल्या या घटनेनंतर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीदायक वातावरण पसरले असून रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.