Monday, May 20, 2024

/

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ‘या’ फौंडेशनचे डीसींना निवेदन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :नुकत्याच साजरा झालेल्या यंदाच्या जागतिक महिला दिनाचे घोषवाक्य ‘महिलांमधील गुंतवणूक’ असे आहे. त्या अनुषंगाने भारतीय संस्कृती फौंडेशन बेळगाव शाखेच्यावतीने महिलांचा उत्कर्ष आणि त्यांच्या बाबतीत होणाऱ्या अन्याय अत्याचारांना आळा घालण्याच्या मागणीसह विविध नागरी समस्यांचे निवेदन आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

भारतीय संस्कृती फौंडेशन बेळगाव शाखेच्या अध्यक्ष प्रमोदा हजारे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाची सुरुवात यंदाच्या जागतिक महिला दिनाचे ‘महिलांमधील गुंतवणूक’ हे घोषवाक्य (थीम) जलद सकारात्मक प्रगतीसाठी महिलांकडे संसाधने समर्थन आणि लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित करते अशी करण्यात आली असून पुढे बेळगाव शहरासह जिल्ह्यात महिलांवर होणारे अन्याय अत्याचारांची माहिती कांही उदाहरणांसह निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

ज्यामध्ये न्यू वंटमुरी, घटप्रभा, तिगडी, बैलहोंगल येथील उदाहरणांचा समावेश असून महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याखेरीस प्रकाशाने भेडसावणाऱ्या नागरी समस्या मांडताना सध्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

 belgaum

त्याचप्रमाणे पाईपलाईनद्वारे केल्या जाणाऱ्या घरगुती नैसर्गिक गॅसच्या बाबतीतही तक्रार करण्यात आली असून सर्वांना हा गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत उपलब्ध व्हावा यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना भारतीय संस्कृती फौंडेशनच्या बेळगाव शाखा अध्यक्षा प्रमोदा हजारे म्हणाल्या की, शहरातील महिला पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवण्यास गेलेल्या महिलांचे समुपदेशन जर त्या स्थानकाचा एक वाहन चालक करत असेल तर हे त्या पोलिस स्थानकाचे अवमूल्यनच आहे. यासंदर्भात त्या वाहन चालकाला जाब विचारल्यास आपली चूक कबूल करण्याऐवजी ‘मी समुपदेशन केले तर काय बिघडले’ असे उद्धट उत्तर त्याच्याकडून मिळते. या पद्धतीने एक गृहरक्षक दलाचा जवान त्या ठिकाणी कौटुंबिक समस्या घेऊन येणाऱ्या महिलांचे समुपदेशन करत असेल तर त्या महिला पोलीस ठाण्याची किंमत काय राहिली? सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे. तसेच सरकारने महिला पोलीस ठाण्याला जास्तीत जास्त महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून दिले पाहिजेत. जेणेकरून महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे प्रमोदा हजारे यांनी स्पष्ट केले.Women memo

माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांनीही यावेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्या शहरात सर्वत्र पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली असून 8 -10 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा गैरवापर होत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागात जलवाहिन्यांना गळती लागली आहे. याकडे पाणी पुरवठा मंडळासह एल अँड टी कंपनीने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी. पाण्याच्या गळत्या युद्धपातळीवर दुरुस्त केल्या जाव्यात. गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्याचप्रमाणे जलवाहिनीला मोटार बसून बेकायदा पाणी उपसा जात आहे. पिण्याचे पाणी अंघोळीसाठी किंवा आपल्या गाड्या धुण्याकरिता तसेच बगीच्यातील झाडे वगैरेंसाठी वापरले जाऊ नये.

नळाचे पाणी हे फक्त पिण्यासाठीच वापरले जावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रभागांमध्ये व्हाॅल्वमनला समज द्यावी. याव्यतिरिक्त सध्या सर्वत्र विकास कामाच्या नावाखाली खोदकाम सुरू आहे. त्यामुळे गॅस पुरवठ्याची ही समस्या निर्माण झाली आहे. याकडेही संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होईल याकडे लक्ष द्यावे गॅस कंपनीने देखील सर्वांना लवकरात लवकर गॅस पुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे सुधा भातकांडे म्हणाल्या. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी भारतीय संस्कृती फाउंडेशन बेळगावच्या उपाध्यक्ष गौरी गजबर, जिल्हा सचिव सुनीता सुभेदार, अनुराधा सुतार, मंदा नेवगी, उर्मिला मन्नूरकर, शांता जाधव, रेखा अन्नीगिरी, प्रीती लोहार, अंजना लोहार, वर्षा तिनईकर, वैष्णवी मुचंडीकर, सुनिता ओरेवाले, शेवंता तवनोजीचे, संध्या वर्पे आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.