Sunday, July 21, 2024

/

लोकसभेसाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार : सतीश जारकीहोळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आगामी लोकसभा निवडणुकीत प्रियांका जारकीहोळी निवडणूक लढवणार नसून या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज दिली. चिकोडी भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आज बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. चिकोडी भागातून अनेक कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. यामुळे बेळगाव आणि चिकोडी भागात कुणाला उमेदवारी देण्यात यावी याबाबत चर्चा सुरु आहे, यासंदर्भात हायकमांड अंतिम निर्णय घेईल, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकीत सतीश जारकीहोळी यांना उमेदवारी दिल्यास विजय निश्चित होईल, शिवाय इतरांचे मार्ग सुकर होतील अशी चर्चा आहे. याबाबत प्रसारमाध्यमांना उत्तर देताना ते म्हणाले, हि बाब जरी सत्य असली तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळावी या उद्देशाने आपण निवडणुकीत उतरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चिकोडी भागात जातगणनेपेक्षा उमेदवाराच्या नावाची अधिक चर्चा सुरु आहे. या भागात जातगणनेपेक्षा उमेदवाराच्या लोकप्रियतेच्या आधारावर चर्चा केली जाणार असून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांचेही नाव चर्चेत असल्याचे सतीश जारकीहोळी म्हणाले. उमेदवार निवडीसंदर्भात सर्व्हे करण्यात येणार असून त्यानंतर अंतिम उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल, असे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.Satish j

यावेळी खाऊ कट्टयासंदर्भात सुरु असलेल्या चौकशीबाबतही सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बेकायदेशीर खाऊ कट्टा येथील दुकान गाळ्यांच्या चौकशीचा एक टप्पा पार झाला असून प्राधिकरण स्तरावर नोटीस देण्यात आल्या आहेत. अद्याप नोटिसीला उत्तर आले असून सरकारी स्तरावर याबाबत ज्या काही कायदेशीर अडचणी येतील, त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची जय्यत तयारी सुरु असून दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयासाठी युद्धपातळीवर बैठका सुरू आहेत. आमच्या सरकारने राबवलेल्या हमी योजनांची जनजागृती करण्याचे काम कार्यकर्त्यांकडून केले जात असून येत्या आठवड्यात उमेदवार घोषित केला जाईल, उमेदवार निवडीदरम्यान नवोदितांना संधी देण्यात येणार असून या निवडणुकीत महिला उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार नसल्याचे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.