Saturday, December 7, 2024

/

मुंबई दर्शनासाठी आजी-आजोबांची हवाई सफर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : दुचाकी, चारचाकी अगदी सायकलदेखील पहिल्यांदा आपल्या हाती आली कि याचा आनंद अविस्मरणीय असा असतो. आणि याहूनही हवाई सफारीचा आनंद गगनात मावणार नाही, इतका मोठा असतो.

हाच आनंद शांताई वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी आज अनुभवला. आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेल्या आणि शांताई वृद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करत असलेल्या ४० आजी-आजोबांना हवाई मार्गाने मुंबई दर्शनाची आगळी वेगळी संधी शांताई वृद्धाश्रमाचे कार्यवाहक आणि बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या दरम्यान मुंबई दर्शनासाठी निघालेल्या आजी आजोबांचा विमानात प्रवेश घेतल्यानंतरचा क्षण खरोखरच कॅमेऱ्यात कैद करून ठेवण्यासारखा होता.

आयुष्यभर सुखाच्या शोधात असणारे आपण एकदा तरी विमान प्रवास करावा अशी इच्छा उराशी धरून असतो. मात्र आयुष्याच्या उत्तरायणात आयुष्यभराचे सर्व त्रास, दुःख, वेदना, यातना विसरून हवाई सफर करताना आयुष्यातील सर्व कटू प्रसंग उंच आभाळात सोडून द्यावे आणि उर्वरित आयुष्य उत्तमपद्धतीने जगावे! कदाचित याच भावना शांताई च्या आजी आजोबांनी विमानप्रवासादरम्यान मनात साठवून ठेवल्या असतील.Shantai

अनिल जैन यांच्या नियोजनाने प्रभावित झालेल्या शांताई वृद्धाश्रमाचे संचालक आणि पत्रकार राजू गवळी, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे व माजी महापौर आप्पासाहेब पुजारी यांनी बेळगावचे व्यापारी निलेश बागे यांच्याशी संपर्क साधून मुंबईला जाणाऱ्या आजी-आजोबांना हवाई सफर करण्यासाठी प्रयत्न केले.

या कामी स्टार एअरचे मालक संजय घोडावत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संजय घोडावत यांनी स्टार एयरद्वारे बेळगाव ते मुंबई आणि मुंबई ते बेळगाव या दोन्ही बाजूच्या आजी-आजोबांच्या विमान प्रवासाची सोय करून दिली.

या सर्वांच्या सहकार्याने आजी आजोबांच्या विमान प्रवासाचा योग आज जुळून आला आणि मुंबई दर्शनासाठी निघालेल्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर विमानप्रवासाचे एक वेगळेच कुतूहल देखील पाहायला मिळाले. बेळगाव विमानतळावरून स्टार एअर चा मुंबई प्रवास केल्यानंतर शांताई च्या या आजी-आजोबांच्या शिष्टमंडळाचे मुंबई सहली दरम्यान ताज हॉटेलमध्ये चहापान करण्यात आले आणि विमानतळावर देखील जोरदार स्वागत करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.