Saturday, July 27, 2024

/

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि नितीन बानुगडे -पाटील हे भाषिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक भाषण करून दंगलीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्याची आजची सुनावणी खानापूर न्यायालयाने पुढे ढकलली असून ती 10 जून 2024 रोजी होणार आहे.

आरोप पत्रानुसार कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे गेल्या 26 ऑक्टोबर 2006 रोजी मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात भाषण करताना महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि नितीन बानुगडे -पाटील यांनी कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक भडकाऊ भाषण केले होते असा आरोप आहे.

आपल्या भाषणाद्वारे शांतता भंग करून उपस्थितांना दंगा करण्यास प्रोत्साहित केले. त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी असताना कदम व बानुगडे पाटील यांनी आपल्या प्रक्षोभक भाषणात भगव्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढा. भगव्याला हात लावणाऱ्यांचे हात तोडा, असे म्हंटले होते असेही आरोप पत्रात म्हटले आहे.Ramdas kadam

त्यांच्या या भाषणानंतर प्रक्षुद्ध जमावाकडून खानापुरात तोडफोड, दगडफेक होऊन दंगल झाली. याप्रकरणी खानापूर पोलिसांनी कलम भादवी 153, 153 ए अन्वये 27 ऑक्टोबर 2006 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

या खटल्याची आज गुरुवारी खानापूर न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाने ही सुनावणी येत्या 10 जून 2024 पर्यंत लांबणीवर टाकली आहे. महाराष्ट्रातील नेते रामदास कदम आणि नितीन बानुगडे -पाटील यांच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार आणि ॲड. हेमराज बेंचन्नावर काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.