बेळगाव लाईव्ह:बेळगावच्या सिद्धार्थ प्रोडक्शन या संस्थेची निर्मिती असलेला ‘पुरिया’ हा लघुपटाचे (शॉर्ट फिल्म) गेल्या तीन दिवसांपासून बेळगावात चित्रीकरण होत असून या लघुपटात नामवंत ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्यासह स्थानिक कलाकारांच्या भूमिका आहेत, अशी माहिती सिद्धार्थ प्रोडक्शनचे निर्माता ऋषिकेश कुट्रे यांनी दिली.
‘नानाई’ धामणेकर बंगला भाग्यनगर येथे काल बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, लघुपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या सिने अभिनेत्री व गायिका कल्याणी गजगेश्वर, दिग्दर्शक अभिषेक रत्नपारखी आदी उपस्थित होते. निर्माता ऋषिकेश कुट्रे म्हणाले की, आम्ही सर्वजण कलाक्षेत्रातील आहोत.
आम्हाला काहींतरी करून दाखवायचं होतं. मात्र मला फिल्म इंडस्ट्रीची माहिती नव्हती. कल्याणीमुळे माझा अभिषेक रत्नपारखी यांच्याशी परिचय झाला. त्यावेळी आम्ही एक शॉर्ट फिल्म तयार करण्याचे ठरविले. तेंव्हापासून म्हणजे गेल्या सुमारे दीड वर्षापासून आम्ही या शॉर्ट फिल्मवर काम करत आहोत या शॉर्ट फिल्मचे नाव ‘पुरिया’ असे असून आज चित्रीकरणाचा चौथा दिवस आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये स्थानिक कलाकार असून प्रमुख भूमिका कल्याणी गजगेश्वर या करत आहेत, तर नलिनीताई ही ज्येष्ठ गायिकेची भूमिका अलकाताई कुबल करत आहेत असे सांगून कुट्रे यांनी शॉर्ट फिल्मच्या चित्रीकरणबद्दल माहिती दिली.
दिग्दर्शक अभिषेक रत्नपारखी म्हणाले की, या शॉर्ट फिल्ममध्ये संगीत क्षेत्रातील कथा आहे. त्यामुळे मैफली आणि सुंदर गाणी आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही फिल्म संपूर्णपणे शास्त्रीय (क्लासिकल) आहे. कोणतीही इंडो -वेस्टर्न किंवा वेस्टर्न गाणी यामध्ये नाही. अत्यंत महत्त्वाचे या फिल्म मधील ठुमरी आणि बंदिशे विशेष आहेत. शक्यतो ठुमरी व बंदिशे या पारंपारिक किंवा आधी वापरलेल्या वापरल्या जातात. मात्र या शॉर्ट फिल्मसाठी बंदीशे, ठुमरी, अंगाई असे गाण्यातील वेगवेगळे प्रकार नव्याने लिहिले गेले आहेत. तसेच त्यांचे जे चित्रीकरण झाले आहे ते कोनवाळ गल्ली येथील रिझ चित्रपटगृह अर्थात लोकमान्य रंगमंदिरामध्ये झाले आहे. शॉर्ट फिल्म या जास्तीत जास्त चित्रपट महोत्सवाप्रसंगी प्रदर्शित केल्या जातात त्यामुळे ही फिल्म देखील प्रथम चित्रपट महोत्सवाला जाईल. त्यानंतर ओटीटी मंचावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. पुरिया शॉर्ट फिल्म तयार करण्याचे बजेट साधारण 4.5 लाख रुपये इतके असल्याचे सांगून अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पुरियासाठी काम करणारी टेक्निकल टीमही 70 टक्के बेळगावची आहे, असे रत्नपारखी यांनी सांगितले.
ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी या फिल्ममधील प्रमुख भूमिका करणारी कल्याणी व निर्माते ऋषिकेश यांचे मला मनापासून कौतुक करावे सारखे वाटते हे दोघेही बेळगावचे आहेत. फिल्मच्या टेक्निकल टीम मधील बहुतांश जण तसेच चित्रपटातील कलाकार बेळगावचे आहेत, त्यामुळे खूप बरं वाटलं असे सांगून चित्रीकरण करताना खूप मजा येत आहे, असे सांगितले. बेळगावकरांकडून नेहमीच सहकार्य मिळतं. प्रत्येक ठिकाणी अगत्याने स्वागत केलं जातं, ही गोष्ट इतरत्र फार कमी पहावयास मिळते. कारण सर्व कांही कमर्शियल झालं आहे. ज्येष्ठ कलाकार या नात्याने मी पहिल्यांदाच शॉर्ट फिल्ममध्ये काम करत आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र या शॉर्ट फिल्मची कथा कवयित्री इंदिरा संत यांच्या नातवाने लिहिली आहे ती इतकी अप्रतिम आहे की ती माझ्या मनाला भिडली.
त्यामुळे ही फिल्म करायला मी तात्काळ तयार झाले. काम करण्याचे समाधान सगळीकडे मिळत नाही ते मला या तीन दिवसांच्या चित्रीकरणात मिळत आहे असे सांगून बेळगाचे प्रेक्षक मला दर्दी वाटतात. ज्यावेळी पूर्वी मी येथे नाटकांच्या प्रयोगाने येत होते. त्यावेळी प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळायचा त्याने खूप मजा यायची. आता गणित जमत नाही म्हणून बेळगावला नाटकांचे प्रयोग कमी झाले आहेत. मात्र बेळगावचे लोक हे खरे रसिक आणि दर्दी आहेत, असे अलका कुबल म्हणाल्या.