Monday, April 29, 2024

/

बालकाच्या जीवासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या सहाय्याची प्रतीक्षा

 belgaum

बेळगाव लाईव्ह:मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जगन्नाथ बिर्जे यांचा नातू व खानापूरचे माजी आमदार कै. लक्ष्मण बिर्जे गुरुजी यांचा पणतू शिवांश सोमनाथ बिर्जे याच्यावर तातडीने कर्करोगावरील बोन मॅरो शस्त्रक्रियेची गरज असून त्यासाठी 20 लाखांचा खर्च येणार असल्यामुळे बिर्जे यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे मदत मागितली आहे. सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी देखील त्वरेने 2 लाखाची मदत बिर्जे यांना देण्याची सूचना करण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूर येथील सदस्य जगन्नाथ बिर्जे यांचा अवघा 11 महिन्यांचा नातू शिवांश सोमनाथ बिर्जे याचे जीएमएम ल्युकोमिया कॅन्सर नामक रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. प्रारंभी शिवांश पाच महिन्याचा असताना अंगात ताप येऊ लागल्याने त्याची कोल्हापूर येथील डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी डॉक्टरांनी कॅन्सरची शक्यता वर्तवली.

त्यानंतर उपचार आणि व्यवस्थित निदान व्हावे यासाठी शिवांश कोल्हापूर येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 3-4 आठवडे दाखल होता. मात्र हॉस्पिटलचा खर्च न परवडणारा असल्यामुळे बिर्जे कुटुंबीयांनी शिवांश बरा होताच त्याला घरी आणले. गेल्या ऑगस्ट महिन्यात शिवांशला अधिकच त्रास होऊ लागल्याने त्याला मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी शिवांश वरील उपचार मोफत व्हावेत अशा आशयाचे पत्र टाटा हॉस्पिटलला दिले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी आणखी दोन-तीन चांचण्या केल्यानंतर कॅन्सरचे निश्चित निदान करता येईल आणि त्यासाठी तुम्हाला 3 महिने मुंबईत रहावे लागेल असे स्पष्ट केले.

 belgaum

मात्र मुंबईत राहण्याचा खर्च न परवडणारा नसल्यामुळे बिर्जे कुटुंबीय माघारी येऊन शिवांशची बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेतली. त्यावेळी तेथील डॉ. अभिलाषा यांनी देखील टाटा हॉस्पिटलच्या डॉक्टरांप्रमाणेच चाचण्यांचा सल्ला दिला. त्यावेळी माजी आमदार कै. बिर्जे गुरुजींचे स्नेही माजी मंत्री शिवानंद कौजलगी यांच्या सहकार्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झालेल्या बिर्जे कुटुंबीयांनी केएलईमध्ये शिवांशच्या चांचण्या करून घेतल्या.

तेंव्हा त्याच्या जीएमएम ल्युकोमिया कॅन्सरचे निदान झाले आणि त्यासाठी बोन मॅरो शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर शिवांशवर केएलई हॉस्पिटलमध्ये 4 महिने गेल्या जानेवारीपर्यंत पाच केमोथेरपी उपचार करण्यात आले.Cm relief

बोन मॅरो शस्त्रक्रियेसाठी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये शिवांशला दाखवण्यात आलं तेव्हा तेथील डॉक्टरांनी 22 जानेवारी रोजी शस्त्रक्रिया करू असे सांगितले होते. मात्र त्याचवेळी देशभरात अयोध्या श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र सरकारने सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे शस्त्रक्रिया लांबणीवर पडली. दरम्यान डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी 20 लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले. त्यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधान निधीतून 3 लाख रुपयांची मदत बिर्जे कुटुंबीयांना मिळवून दिली. सध्या त्या संदर्भातील पत्र दिल्लीहून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आलेले आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे देखील कुटुंबीयांनी मदतीसाठी अर्ज केला असून त्याचे उत्तर यायचे आहे. तथापि परवा जगन्नाथ बिर्जे कुटुंबीयांनी सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तूर्तास तातडीने 2 लाख रुपयांचा निधी हॉस्पिटलकडे पाठवण्यात येईल असे स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान चेन्नईच्या मुख्यमंत्र्यांनी 11 महिन्यांपर्यंतच्या बालकांवरील बोन मॅरोच्या शस्त्रक्रिया सरकारकडून मोफत केल्या जातील, असे जाहीर केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील तसा निर्णय घेऊन माझ्या नातवाचे प्राण वाचवावेत. तसे झाल्यास आम्ही त्यांचे आजन्म ऋणी राहू, असे जगन्नाथ बिर्जे बेळगाव लाईव्हशी बोलताना म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.