Wednesday, September 11, 2024

/

सीमा लढ्याचा इतिहास उलगडणाऱ्या व्यंगचित्र प्रदर्शनाला प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज गांभीर्याने पार पडला. या हुतात्मा दिनाचे औचित्य साधून सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या सीमा लढ्याशी संबंधित व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला देखील आजपासून उत्साहात प्रारंभ झाला.

रेल्वेवर ब्रिज नजीकच्या मराठा मंदिर येथे उद्या 18 जानेवारीपासून सार्वजनिक वाचनालयातर्फे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, शैलीदार वक्ते व नामवंत संशोधपटू बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मृती प्रित्यर्थ बॅ. नाथ पै व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या सीमा लढ्याचा इतिहास उलगडणाऱ्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. मराठा मंदिर येथे सदर प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आज सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य आनंद मेणसे म्हणाले की, बॅरिस्टर नाथ व्याख्यानमालेनिमित्त सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या व्यंगचित्रांच्या या प्रदर्शनाचे आयोजन करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. सलग दोन-तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने सीमा लढ्यात काय काय घडले याची माहिती नव्याने सर्वांना कळेल. त्याचप्रमाणे 28 जानेवारी रोजी तुकाराम महाराज भवनामध्ये साहित्य संमेलन आहे. त्यानिमित्ताने देखील या प्रदर्शनाचे त्या ठिकाणी आयोजन केले जाणार आहे. एक व्यंगचित्र हे एका संपूर्ण लेखाचा सारांश सांगणारे असते. जगभरातील व्यंगचित्रकारांनी आपापल्या प्रदेशातील राज्यकर्त्यांवर आपल्या व्यंगचित्रांद्वारे एक वेगळ्या प्रकारचा वचक ठेवला होता. भारतात तसा वचक शंकर पिल्ले या व्यंगचित्रकारांनी निर्माण केला होता. ज्यामुळे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू देखील प्रभावित झाले होते. गेल्या कांही दशकात आर. के. लक्ष्मण हे एक दिग्गज व्यंगचित्रकार होऊन गेले.

व्यंगचित्र हे नेहमीच ताज्या घडामोडींवर खुसखुशीत भाष्य करणारे असते. वास्तवातील घटनांचा अचूक वेध घेत व्यंगचित्र कधी उत्तम फटकार मारते, कधी प्रबोधन करते तर कधी मनोरंजन करते. हे कार्य बेळगावच्या स्थानिक पातळीवर व्यंगचित्रकार जगदीश कुंटे गेली 40 वर्ष सातत्याने करत आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे सांगून एखादी चळवळ यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये विचारवंत, कलाकार, चित्रकार, पत्रकार, शास्त्रज्ञ, लेखक, कवी वगैरे सर्व प्रकारचे लोक असावे लागतात तेव्हाच ती चळवळ यशस्वी होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही त्याच पद्धतीची चळवळ आहे. त्यामुळे ती वृद्धिंगत होऊन यशस्वी झाली.

जनतेने चिकाटीने चालवलेली ही भारतातील सर्वात मोठी चळवळ आहे. देशात सर्वात मोठे दोनच प्रश्न होते, एक काश्मीरचा आणि दुसरा महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वाद. त्यापैकी काश्मीर प्रश्न राज्यकर्त्यांनी आपल्या पद्धतीने जवळपास सोडवला आहे. त्यामुळे आता फक्त आमचा सीमाप्रश्न राहिला आहे असे सांगून माजी प्राचार्य मेणसे यांनी सीमा आंदोलनाची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांनी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या आपल्या व्यंगचित्रांची माहिती दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.