Friday, July 19, 2024

/

इस शहर को ये हुआ क्या है?? हर तरफ धुआं धुआंसा है..

 belgaum

इस शहर को ये हुआ क्या है?? हर तरफ धुआं धुआंसा है..

इस शहर को ये हुआ क्या है??हर तरफ धुआं धुआंसा है…!!!

बेळगाव लाईव्ह :कर्करोगाशी निगडित असलेल्या या जाहिरातीच्या माध्यमातून सरकारने जनतेला सतर्क करण्यासाठी प्रयत्न केले. सोशल मीडियावर या पंक्तींवर आधारित मिम्स देखील वायरल झाल्या. कर्करोगापेक्षाही भयानक वाटणाऱ्या कोविडसारख्या रोगराईला साऱ्या जगाला सामोरे जावे लागले. यानंतर प्रत्येकजण आपल्या आरोग्याला जपू लागला, आरोग्याची काळजी घेऊ लागला. आरोग्याने कसे तंदुरुस्त राहता येईल यासाठी प्रत्येकजण धडपडू लागला. मात्र, इतकी कसरत करूनही बेळगावच्या वाढत्या वायू प्रदूषणामुळे ‘अख्खं मुसळ केरात’ जात आहे!!

बेळगावचा विकास झपाट्याने होत आहे. विकासाकडे वाटचाल करताना उद्योग-धंदेदेखील वाढत आहेत. आणि पर्यायाने हळूहळू शहराच्या प्रदूषणातही वाढ होत चालली आहे. अलीकडेच एका सर्वेक्षणातून जाहीर झालेल्या अहवालानुसार बेळगाव शहराचा प्रदूषणाच्या यादीत राज्यात पहिला तर जगातील ७३२३ शहरांमध्ये १५९ वा क्रमांक आहे. बेळगाव शहराच्या वायुप्रदूषणात सर्वाधिक भर घालणारी बाब हि वाहनातून निघणाऱ्या धुराची असल्याचे निदर्शनास येत आहे.

वायू प्रदूषणात गेल्या काही वर्षात सर्वाधिक कारणीभूत ठरत असलेले वाहनातून बाहेर सोडले जाणारे कार्बन मोनॉक्साइड, हायड्रो कार्बन्स, नायट्रोजन ऑक्साईड हे घटक. बेळगावमध्ये धावणाऱ्या अनेक सरकारी बसमधून तसेच अनेक अवजड वाहनातून मोठ्या प्रमाणात अशापद्धतीने धूर बाहेर फेकले जात आहेत. वाहनांची उत्सर्जन चाचणी (इमिशन टेस्ट) करणे अनिवार्य असले तरीही अनेक वाहनधारक याकडे दुर्लक्ष करताना आढळून येत आहेत. ठराविक कालावधीनंतर अशापद्धतीची वाहने भंगारात काढून, अशी वाहने वापरण्यावर बंदी घातली जाते. परंतु बेळगाव शहरात असंख्य सरकारी बस, चारचाकी, अवजड वाहने, खाजगी प्रवासी वाहने बिनधास्तपणे चालविताना आढळून येत आहेत. वाहनाची वैधता संपूनही ती बिनदिक्कतपणे रस्त्यावर हाकताना निदर्शनास येत आहे.Air pollution

अशा वाहनांच्या वापरासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही नियम ठरवून दिले आहेत. मात्र या नियमांची अंमलबजावणी बेळगावमध्ये केलेली दिसून येत नाही. सरकारने डिझेल वाहनांसंदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. मात्र शहराचा होत असलेला झपाट्याने विस्तार, शहरात होणारी वाहतूक कोंडी आणि यामुळे निर्माण झालेला प्रदूषणाचा विळखा नागरिकांच्या आरोग्यासाठी जीवघेणा ठरत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोविडमुळे लागलेली मास्कची सवय जनतेला हल्ली कोविड पासून बचावासाठी नव्हे तर चक्क रस्त्यावरून जाताना प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी जोपासावी लागत आहे. देशात दिल्ली आणि मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वाढत्या प्रदूषणाचा विषय गंभीर बनला आहे. मात्र या शहरांपाठोपाठ आता बेळगावचा नंबर देखील भविष्यात अव्वल यादीत लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

एकीकडे स्मार्ट सिटी च्या बढाया मारणारे बेळगावकर दुसरीकडे मात्र पुढील पिढ्यांना मोकळा श्वास घेता येईल का? या विवंचनेत दिसून येत आहेत. वाढत्या वायुप्रदूषणाचा धोका लक्षात घेता बेळगाव महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी योग्य दिशेने कारवाई करण्याचे प्रयत्न सुरु करण्याची गरज आहे. ज्यापद्धतीने नागरिकांना हेल्मेटसक्तीसह इतर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वेठीला धरले जाते, त्याचपद्धतीने आणि त्याच आवेगाने वाहनाच्या इतर महत्वपूर्ण बाबींकडेही रहदारी विभागाने कटाक्षाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे हेल्मेट हे वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे आहे, त्याचप्रमाणे आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या या गोष्टींना आळा घालणेही तितकेच महत्वाचे आहे. वाहनातून निघणाऱ्या घातक वायूंमुळे दमा, अर्धांगवायू, हृदय आणि फुफ्फुसाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. यामुळे अकाली मृत्यूला देखील सामोरे जावे लागते. ज्या बेळगाव शहराला भरभरून निसर्गसंपदा लाभली आहे, जे बेळगाव गरिबांचे महाबळेश्वर म्हणून परिचित आहे, अशा बेळगावची ओळख प्रदूषित शहरांच्या यादीत केली जाऊ नये, यासाठी बेळगाव महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहणे महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.