बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्याच्या एका दिशेतून येणारा जगप्रसिद्ध सुगंध सध्या भ्रष्ठाचाराच्या दुर्गंधात हरवू लागला आहे की काय? असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. सहकाराच्या क्षेत्रात सुरु असलेला भ्रष्ठाचार इतक्या मोठ्या टप्प्यावर पोहोचला आहे की आता त्याचे स्वरूप महागंभीर झाले आहे.
बुधवारी त्याच्या झालेल्या जाहीर चर्चेनंतर तर आता स्वतःला समाजसेवक म्हणवून घेणारे किती खोलात आहेत याचीच प्रचिती येऊ लागली असून गडाच्या पायथ्यावरील त्या भ्रष्ट मंडळींची पोलखोल करणाऱ्या बेळगाव लाइव्हवर आताच कौतुकाची थाप पडू लागली आहे.
सदर भाग जगप्रसिद्ध अशा बासमती भातासाठी प्रसिद्ध. येथील शिवाराजवळून जाताना नाकात बासमतीचा सुगंध भरल्याशिवाय राहत नाही. हा सुगंध फक्त त्या शिवारापुरताच मर्यादित नसून तो जगभरात प्रसिद्ध आहे. तसाच या भागात फुललेला सहकारही प्रसिद्ध आहे.
मात्र या प्रसिद्धीला सामाजिक सेवेचा दिखावा आणि लुटीचा मुलामा चढल्याने आता एक विचित्र दुर्गंध पसरला आहे. हा खोटेपणाचा दुर्गंध येथे फुललेल्या सहकाराला त्रासदायक ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
गुरुजनांनी सहकाराचा आदर्श घालून देताना काही प्रमाणात स्वाहाकाराचेही मळे फुलवले. संस्थेची कर्जे फुगवून मालमत्ता लाटण्याचा आदर्श निर्माण केला. कर्जदारांना मोकळे करण्याच्या नावाखाली त्यांच्या जमिनी लाटल्या आणि आपल्या नावावर चढविल्या.
कर्ज वाढतच जात आहे आणि आज जमिनी सुद्धा तारण असल्यातरी म्हणावा तसा दर येत नाही. अशी परिस्थिती आहे. मात्र स्वान्तसुखाय हा एकमेव मंत्र जपणाऱ्या सहकार महर्षींना याचे सुख दुःख नाही. आज त्यांचाच कित्ता त्यांचे शिष्य गिरवू लागले आहेत. जमीन विक्रीच्या जाहीर चर्चेतील खाडाखोडीचा उतारा हे एकमेव उत्तर त्यावर आहे. सभासद आणि ठेवीदारांनी यासंदर्भात आपली बुद्धी वापरली तर वडिलोपार्जित ५ गुंठ्याचीही लायकी नसणार्यांनी ६० एकराची खरेदी केली कशी? याचा अंदाज येऊ शकणार आहे.
सहकार चालविताना अशा संस्थेकडून नियम मोडले जात असताना सहकार खाते कसे मूग गिळून वर्षोनुवर्षे गप्प बसले? हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. दरवर्षी एकाच ऑडिटरने तयार केलेला लपवाछपवीचा अहवाल सादर करायचा आणि त्यावर हरकती घेणाऱ्यांची पाकिटे देऊन तोंडे बंद करायची. असा कारभार सहकार खात्यानेही चालविला आहे असे दिसत आहे.
या साऱ्या परिस्थितीत सुधारणा व्हायची असेल तर मागील चुकांना क्षमा नाही आणि पुढे चुका होऊ द्यायच्या नाहीत. हे तत्व संस्थेतील सज्जन लोकांना जोपासावे लागेल. अन्यथा करून गेले गाव आणि सध्याच्या चेअरमनचे नाव असे म्हणत सध्या खुर्चीवर विराजमान व्यक्तींना चौकशीचा ससेमिरा आणि कारावास सहन करण्याची वेळ येऊ शकते.
शिवारातील बासमतीचा सुगंध परत मिळवून घ्यायचा असेल तर वाढलेला भ्रष्ठाचाराचा दुर्गंध मिटवावा लागणार आहे. संस्थेच्या जीवावर घेतलेल्या जमिनींची विक्री थांबवावी लागणार आहे. विक्री झाल्यास संबंधितांच्या घशात ती रक्कम न जाता फुगलेली कर्जे मोकळी करावी लागणार आहेत. चोर ठरलेल्या प्रत्येकाला शाषन झाल्याशिवाय आता शांतता नाही. ( क्र. म. श. )