Friday, April 19, 2024

/

शिवजयंती मिरवणुकीला मूर्त स्वरूप मिळावे!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच प्रत्येक शिवभक्तामध्ये उत्साह संचारतो, रक्त सळसळते, अंगावर शहारे उठतात. बेळगावमधील शिवभक्तांची तर अशा बाबतीत तुलनाच न केलेली बरी! बेळगावमधील हजारो शिवभक्त शिवछत्रपतींना आराध्य मानत अनेक उपक्रम राबवतात. अशातच बेळगाव मधील शिवजयंती आणि शिवजयंती निमित्त काढण्यात येणारी चित्ररथ मिरवणूक हि यापैकीच एक.

शतकोत्तर परंपरा लाभलेली बेळगावची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक परंपरा जगाच्या पाठीवर बेळगावप्रमाणे कुठेच साजरी झालेली पाहायला मिळत नाही. शिवभक्तांचा जल्लोष, उत्साह, हुबेहूब साकारली जाणारी पात्रे, शिवकालीन देखावे अशा वातावरणात आयोजिण्यात येणारी चित्ररथ मिरवणूक तब्बल १४ तासांहून अधिक काळ सुरु असते. बेळगावमधील मिरवणुकीचा मार्ग गर्दीने अक्षरशः तुडुंब भरलेला असतो. झांझ, ढोल, ताशा, ध्वजधारी, शिवकालीन आणि पारंपरिक वेशभूषेतील नागरिक, चित्ररथासमोर देखावे पाहण्यासाठी झालेली गर्दी, प्रेक्षकांची मिळणारी दाद, चित्ररथ मिरवणुकीसाठी महिनाभर आधीपासून तयारीत गुंतलेले कार्यकर्ते, देखावा सादरीकरणातील कलाकार, साहित्याची जमवाजमव करून चित्ररथ मिरवणुकीचा सोहळा निर्विघ्न पणे पार पाडण्यासाठी धडपडणारे सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रेक्षकांची दाद मिळवण्यासह विविध आयोजकांकडून आयोजिली जाणारी स्पर्धा आणि संपूर्ण मिरवणुकीचे आयोजन करण्यासह मिरवणूक सुरळीत, शांततेत पार पाडण्यासाठी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाकडून केले जाणारे नियोजन या सर्वच गोष्टी अफलातून आहेत.

१०८ वर्षांपूर्वी बैलगाडीवरून सुरु झालेली चित्ररथ मिरवणुकीची परंपरा आज ३५० हुन अधिक सार्वजनिक मंडळांच्या सहभागातून भव्य-दिव्य पद्धतीने पार पडत आहे. अक्षय्य तृतीयेनंतर तीन दिवसांनी म्हणजेच परंपरेनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या श्री शिवजयंतीच्या तिसऱ्या दिवशी आयोजिली जाणारी हि मिरवणूक यंदा विधानसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आली असून सदर मिरवणूक येत्या २७ मे रोजी आयोजिण्यात आली आहे. या मिरवणुकीसाठी शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून चित्ररथ मिरवणुकीसाठी मंडळांची जुळवाजुळव सुरु झाली आहे.

 belgaum
File pic belgaum shivjayanti
File pic belgaum shivjayanti

बेळगावमध्ये आयोजिल्या जाणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत डोळ्याचे पारणे फिटेल अशा पद्धतीचे देखावे साजरे केले जातात. उंट, हत्ती, घोडे, बैलगाड्या यासह फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषी वातावरणात मिरवणूक काढली जाते. मात्र गेल्या काही वर्षात परंपरा आणि ऐतिहासिक देखाव्याला बगल देत काही मंडळांनी समाजाविषयावर भाष्य करणाऱ्या देखाव्यांकडे भर दिला आहे. याचप्रमाणे चित्ररथासमोर पारंपरिक ढोल-ताशा-झांझ पथकांची जागा डॉल्बीच्या दणदणाटाने घेतली आहे. परिणामी या चित्ररथ मिरवणुकीचा मुख्य हेतू बाजूला सरत असल्याचे दिसून येत आहे.

बेळगावची शिवजयंती मिरवणूक हि पारंपरिक, ऐतिहासिक धाटणीची आहे. मात्र अलीकडे काही तरुणांमुळे आणि काही अतिउत्साही मंडळांच्या कार्यकर्त्यांमुळे या मिरवणुकीचे रूपांतर वरातीप्रमाणे वाटू लागले आहे. छत्रपती शिवरायांचे पराक्रम हे सातासमुद्रापार पोहोचले आहेत. जगणेही शिवरायांच्या इतिहासाची दखल घेत शिवरायांच्या तत्वांवर आधारित अनेक गोष्टींचे अनुसरण केले आहे. मात्र आपल्याच मातीतील मावळ्यांनी आपलाच इतिहास अशापद्धतीने पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला तर यामागची पवित्रता नष्ट होईल. ज्यांना आपण आराध्य मानतो, ३५० वर्षांनंतरही ज्यांच्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण करून आपण त्यांच्या तत्वांचा वारसा पुढील पिढीकडे सोपविण्याचा प्रयत्न करतो या साऱ्या गोष्टींना कुठेतरी तडा जात असल्याचे दिसून येत आहे.

शिवरायांचा इतिहास जागवून, इतिहासाची पाने चालण्याची संधी १०८ वर्षांपूर्वी बेळगावमधील शिवभक्तांनी आपल्याला दिली आहे. बेळगावच्या शिवजयंतीचे आणि शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे गोडवे देशासह परदेशातही गायिले जातात. मात्र शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या परंपरेला फाटा देऊन इतर गोष्टींकडे ज्यापद्धतीने शिवभक्तांचा कल वाढत आहे, हि परिस्थिती बदलून बेळगावच्या शिवजयंतीला पुन्हा मूर्त स्वरूप देण्याची नितांत आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.