बेळगाव लाईव्ह : भाजपने जाहीर केलेल्या उमेदवार यादीनंतर भाजपमधील अनेक नेत्यांनी भाजपाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून याचा मुहूर्त अथणी मतदार संघाचे माजी आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी साधत अखेर काँग्रेस पक्षाची वाट धरली आहे.
२०२३ सालच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीबाबत भाजपच्या गोटात मोठे राजकारण झाले. उमेदवार निश्चित करण्यात हायकमांडसमोर आडमुठे धोरण ठेवून पेच निर्माण केलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्याच समर्थक उमेदवारांना उमेदवारी देण्याची मागणी हायकमांडकडे उचलून धरली.
कर्नाटकाच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावणारे रमेश जारकीहोळी उमेदवार निश्चित करण्यात किंगमेकर ठरले. मात्र यामुळे भाजपच्या दुसऱ्या गटात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला.
याचाच भाग म्हणून अनेक मतदार संघातील इच्छुकांनी इतर राष्ट्रीय पक्षांच्या मार्गाची निवड केली असून लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घोषणा कर्नाटक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे.
भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेंगळूरमध्ये १२ एप्रिल रोजी त्यांनी विधानपरिषद सदस्य पदासह भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सवदी यांनी राजीनामा दिला होता. यावेळी नाकारण्यात आलेल्या उमेदवारीसंदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते, मी एक स्वाभिमानी राजकारणी आहे, भिकेचा कटोरा घेऊन फिरणारा नाही.
याचदरम्यान त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत जोरदार चर्चाही सुरु होती. अखेर सवदी यांनी आज काँग्रेसची वाट धरत आगामी निवडणुकीसंदर्भात ठोस निर्णय घेण्यासंदर्भात पाऊले उचलल्याचे निदर्शनात येत आहे.