Saturday, April 20, 2024

/

‘राकसकोप’ची पातळी घटली! बेळगावकरांसमोर पाणी टंचाईचे सावट!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोलमडले आहे. अनेक ठिकाणी पाण्यावरून वादावादी घडत आहे. तर २४ तास पाणी पुरवठा योजनाही सुरळीत सुरु नसल्याने पाणी पुरवठा मंडळाच्या नावाने नागरिक शिमगा साजरा करत आहेत. दरम्यान संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘राकसकोप’ जलाशयाच्या पाणीपातळीत पुन्हा घट झाली असून केवळ मे महिन्यापर्यंतच पुरेल इतका पाणीसाठा सध्या जलाशयात आहे.

सध्या राकसकोप जलाशयात पंधरा फूट इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाकडून मिळाली आहे. सदर पाणी मे अखेरपर्यंतच पुरणार असल्याने पुढील दोन महिने बेळगावकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.

गेल्या अडीज ते तीन वर्षात जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाली नव्हती. २०२० साली उन्हाळ्यातदेखील पुरेसा पाणीसाठा होता. मागील वर्षी अवकाळी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जलाशयाच्या पाणीपातळीत म्हणावी तितकी वाढ झाली नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात उन्हासह पाणीटंचाईच्या झळाही बेळगावकरांना सोसाव्या लागत आहेत.

यापूर्वी शहर पाणीपुरवठ्याचे नियोजन पाणीपुरवठा मंडळाकडून केले जात होते. त्यामुळे राकसकोप जलाशयातील पाणीसाठा किती दिवस पुरेल, याची माहिती एल अँड टी कंपनीपेक्षा पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांना अधिक आहे. राकसकोप जलाशयातील पाणीपातळी सध्या २४६१.७० फूट आहे. गतवर्षी जलाशयातील पाणीपातळी २४६५.८५ फूट इतकी होती, पण गतवर्षीच्या तुलनेत यंदा चार फूट पाणीसाठा कमी आहे.

जलाशयातील पाणीसाठा २४४६ फूट झाल्यानंतर मृत साठ्यातील पाण्याचा उपसा करावा लागतो. यापूर्वी २०१४ साली डेडस्टॉक मधील पाण्याचा उपसा करण्यात आला होता. सध्याचा पाणीसाठा पाहता मे अखेरपर्यंत बेळगाव शहराला सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो. जून महिन्यात मान्सूनला सुरुवात झाल्यास पाणीपुरवठा सुरळीत होईल, मात्र मान्सूनला विलंब झाल्यास डेड स्टॉकमधून पाण्याचा उपसा करावा लागण्याची शक्यता आहे.

Rakaskopp dam
File pic: Rakaskopp dam

शहराला राकसकोप व हिडकल या दोन जलाशयातून पाणीसाठा होतो. यंदा हिडकल जलाशयातील पाणीसाठा गतवर्षीइतकाच आहे. गतवर्षी २३ मार्च रोजी हिडकल जलाशयात १३.२७७ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा हिडकल जलाशयात १३. ३५१ टीएमसी पाणीसाठा आहे. शिवाय हिडकल जलाशयातील एक टीएमसी पाणी बेळगाव शहरासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जलाशयातील पाणीसाठा कमी झाला, तरी शहराला आवश्यक पाणी तेथे उपलब्ध असते. मात्र, शहराला पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी राकसकोप व हिडकल या दोन्ही योजना सुरू असणे आवश्यक आहे. दोन्हीपैकी एका योजनेचे पाणी बंद झाल्यास शहरात पाणीटंचाईची स्थिती उद्भवते.

यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलपासूनच बेळगावकर पाणी टंचाईला तोंड देत आहेत. अशातच विविध ठिकाणी जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सध्या बेळगावला पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट एल. अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. मात्र या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पाणीपुरवठ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची तक्रार नागरिक करत आहेत. शहरातील सध्याची पाणीटंचाई आणि राकसकोपमधील घटलेली जलाशयाची पातळी पाहता येत्या दोन महिन्यात पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न केल्यास पाणी टंचाईची स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.