Thursday, April 25, 2024

/

कर्नाटकात काँग्रेसचा विजय निश्चित -ॲड. अणवेकर

 belgaum

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जास्तीत जास्त जागा जिंकून सत्तेवर येईल आणि त्यानंतर दिलेल्या आपल्या आश्वासनांची निश्चितपणे पूर्तता करेल याची जनतेने खात्री बाळगावी, असे निवडणुकीसाठी इच्छुक केपीसीसी -ओबीसी विंगचे राज्य उपाध्यक्ष ॲड. चंद्रहास अणवेकर यांनी स्पष्ट केले.

शहरातील हॉटेल आदर्श पॅलेस येथे आज शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. केपीसीसी -ओबीसी विंगचे राज्य उपाध्यक्ष असण्याबरोबरच कर्नाटक राज्य सेवा दलाचे संयोजक सचिव आणि उच्च न्यायालयाचे वकील असलेले ॲड. चंद्रहास जी. अणवेकर हे बेळगाव दक्षिण मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. अणवेकर म्हणाले की, काँग्रेस पक्ष आणि प्रदेश काँग्रेस कमिटीने कर्नाटकात सत्तेवर येताच जनहितार्थ चार महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचे जाहीर केले आहे. यापैकी भाग्य ज्योती या पहिल्या योजनेअंतर्गत प्रत्येक घराला 200 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. दुसरी योजना गृहलक्ष्मी योजना असून या योजनेअंतर्गत प्रत्येक गृहिणीला दरमहा 2 हजार रुपये गौरव धन दिले जाईल. तिसऱ्या अन्नभाग्य योजनेअंतर्गत गरिबी रेषेखालील प्रत्येक माणसाला 10 किलो तांदूळ मोफत दिला जाईल. युवा निधी योजनेअंतर्गत बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3000 रुपये तर पदविका डिप्लोमा धारकांना 1500 रुपये सहाय्यधन दिले जाईल. राज्यात काँग्रेस सत्तेवर येणार हे निश्चित असून या योजना देखील निश्चितपणे राबविल्या जातील याची जनतेने खात्री बाळगावी.Anvekar

 belgaum

सध्याचे निवडणूक सर्वेक्षण पाहता राज्यातील एकूण 224 जागांपैकी 127 ते 130 जागांवर काँग्रेस उमेदवार निवडून येतील असा अंदाज आहे. आम्ही बेळगावमध्ये केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला विजयी करण्याच्या दृष्टीने कामाला लागलो आहोत.

सतीशअण्णा जारकीहोळी यांनी अन्य भागाबरोबरच बेळगाव दक्षिण मतदार संघामध्ये बरेच कार्य केले आहे. विशेष करून येथील विणकर बांधवांच्या हिताच्या दृष्टीने ते कार्यरत असतात असे सांगून विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास ॲड. चंद्रहास अणवेकर यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि निवडक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.