Friday, April 26, 2024

/

पाहुणे म्हणून आलेल्या भामट्यांनी लांबविला अडीच लाखाचा ऐवज

 belgaum

वर -वधू कडील मंडळी सावध नसतील तर लग्न सोहळ्याच्या घाईगडबडीचा गैरफायदा घेत भामटे किंमती ऐवजावर डल्ला मारतात हे अलीकडच्या काळात सर्वश्रुत आहे. याचाच प्रत्यय महावीर भवन येथे आला असून पाहुणे म्हणून आलेल्या भामट्यांच्या त्रिकूटाने सोन्यासह सुमारे अडीच लाखाची रक्कम असणारी पर्स हातोहात लंपास केल्याची खळबळजनक घटना काल घडली. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये त्या भामट्यांची छबी कैद झाली आहे.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की शिंदोडी येथील नंदकिशोर अजरेकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा काल शुक्रवारी गोवावेस येथील महावीर भवन मंगल कार्यालयात पार पडला. मात्र सदर सोहळा सुरू असताना पाहुणेमंडळींसह सर्वजण घाईगडबडीत असल्याचा फायदा पाहुणे म्हणून आलेल्या भामट्यांनी उठविला.

नवरदेवाची आई रेणुका यांनी नातेवाईकांसोबत फोटो काढण्यासाठी आपल्या हातामधील रोख रक्कम व दागिने असलेली पर्स खाली खुर्चीवर ठेवली. त्यावेळी महिला व पुरुष अशा दोन भामट्यांबरोबर आलेल्या लहान मुलीने खुर्चीवर ठेवलेली रेणुका यांची पर्स हातोहात लंपास केली. त्यानंतर त्या मुलीबरोबर आलेली महिला आणि पुरुष यांनी शिताफिने मंगल कार्यालयातून पोबारा केला.Theft

 belgaum

फोटो काढण्याची घाई गडबड उरकताच रेणुका आपली पर्स घेण्यासाठी गेल्या असता ती गायब झाली होती. अखेर सर्वत्र शोधाशोध करून देखील पर्स सापडू शकली नाही. रेणुका यांच्या पर्समध्ये दीड तोळा सोन्याच्या दागिन्यांसह नातेवाईक व मित्रमंडळींनी दिलेली पैशाच्या आहेराची पाकिटे होती. त्यामुळे जवळपास अडीच लाखाचा ऐवज भामट्यांनी लांबवल्याचा संशय आहे. चोरीच्या घटनेनंतर महावीर भवन मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एक महिला पुरुष आणि लहान मुलगी रेणुका यांची पर्स घेऊन मंगल कार्यालयाबाहेर पडतानाची छबी कैदे झाली आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस त्या भामट्यांचा शोध घेत आहे.

दरम्यान लग्न समारंभाप्रसंगी पै पाहुण्यांची मोठ्या प्रमाणात ये -जा सुरू असते घाई गडबड असते हे मान्य असले तरी वधु -वराकडील मंडळींनी आपल्याकडील किमती ऐवजाच्या बाबतीत जागरूक असणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया महावीर भवन येथे चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर उपस्थित जाणकारांमध्ये व्यक्त होताना दिसत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.