Wednesday, April 24, 2024

/

बुधवार पासून भव्य ‘शिवसन्मान पदयात्रा’ – रमाकांत कोंडुसकर

 belgaum

छत्रपती शिवरायांचा अवमान रोखण्यासाठी तसेच मराठी माणसांच्या एकजुटीची ताकद प्रशासनासह राजकारण्यांना दाखवून देण्याबरोबरच मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमान जपण्यासाठी येत्या 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये भव्य शिवसन्मान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी दिली.

शहरातील जत्तीमठ येथे आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कोंडुसकर बोलत होते. शिवसन्मान पदयात्रेबाबत माहिती देताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, सदर पदयात्रा सलग 5 दिवस म्हणजे 26 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. पदयात्रेचा शुभारंभ 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता येळ्ळूर राजहंसगड येथून होणार आहे. त्यानंतर दर दिवशी विविध गावांमधून फिरवून शेवटच्या दिवशी 26 फेब्रुवारी रोजी बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी या पदयात्रेची सांगता होणार आहे. पहिल्या दिवशी राजहंसगड येथून यरमाळ, अवचारट्टी, देवगनहट्टी व धामणे गावात या पदयात्रेद्वारे जनसंपर्क केला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी येळ्ळूर येथे जनजागृती केली जाणार आहे.

संपूर्ण भारत स्वातंत्र्य उपभोगत असताना बेळगाव सीमा भागात मात्र पारतंत्र्यासारखी स्थिती आहे. मराठी माणसाचा आत्मसन्मान चिरडण्याची एकही संधी कर्नाटक शासन सोडत नाही. या पार्श्वभूमीवर विविध उद्देश समोर ठेवून या शिवसन्मान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या काळात जनजागृतीसाठी मी स्वतः ग्रामवास्तव्य करून गावकरी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. पहिल्या दिवशी येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिरात माझे वास्तव्य असेल. पदयात्रा कालावधीत गावागावात व्यसनमुक्ती व शिवचरित्रावर व्याख्याने होणार आहेत. कोल्हापूरचे मधुकर पाटील यांना यासाठी खास निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती कोंडुसकर यांनी दिलीShiv sanman padyatra

 belgaum

एकंदर मराठीजनांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा अवमान रोखण्यासाठी, मराठी माणसाचा स्वाभिमान असणाऱ्या भगव्याच्या रक्षणासाठी, राजकारणापुरता छत्रपती शिवरायांचा वापर करणाऱ्यांना योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी, प्रशासनाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीला सशक्त होऊन सामोरे जाण्यासाठी, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद प्रशासनासह राजकारण्यांना दाखवून देण्यासाठी, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमान जपण्यासाठी, विकासाच्या नावावर सुरू असलेले भ्रष्टाचाराचे षडयंत्र उधळून लावण्यासाठी, रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवरायांचे नाव देण्यास भाग पाडण्यासाठी, मराठी तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी, राजकीय स्वार्थ ठेवून तरुण पिढीला वाम मार्गाला लावणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी, बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकासातून जनतेची प्रगती करण्यासाठी, आपल्या मूलभूत हक्कासाठी आवाज उठवून आपले हक्क मिळवण्यासाठी, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकून मराठी तरुणांना लक्ष करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना हिसका दाखवण्यासाठी तसेच मराठीत तरुणांचे भविष्य उज्वल करण्यासाठी ही शिवसन्मान पदयात्रा आयोजित करण्यात आली असल्याचे रमाकांत कोंडुसकर यांनी स्पष्ट केले.

आगामी 28 फेब्रुवारी रोजी मुंबईत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धरणे आंदोलनाची जनजागृती या शिव सन्मान यात्रेच्या माध्यमातून करणार असल्याचेही कोंडूस्कर यांनी यावेळी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.