belgaum

आमचा हा लढा हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही तर सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्रातील जनतेला आमच्याबरोबर नेण्यासाठी हे आंदोलन आहे. महाराष्ट्राने, महाराष्ट्र सरकारने याचा विचार करावा आणि जिद्दीने आम्हाला पाठबळ द्यावे एवढीच माझी विनंती आहे, अशी प्रतिक्रिया मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केली.

bg

मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज मंगळवारी छेडण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला प्रारंभ होण्यापूर्वी आंदोलन स्थळी दळवी बेळगाव लाईव्हशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राबद्दल सीमावासीय मराठी लोकांच्या मनात जे बीज रुजला आहे त्याच्या जोरावर यश मिळविल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. हे महाराष्ट्र सरकारने आणि येथील जनतेने ध्यानात ठेवावे.

महाराष्ट्रात जाण्याच्या आशेवर हे सीमाबांधव येथे जमले आहेत. महाराष्ट्रातील लोकांनी आम्हाला साथ द्यावी म्हणून आम्ही येथे आलो आहोत. आमचा लढा कुणाच्या विरोधात नाही. महाराष्ट्राला आमच्याबरोबर नेण्यासाठी हे आंदोलन आहे. महाराष्ट्र सरकारने आणि येथील जनतेने याचा विचार करावा आणि जिद्दीने पाठबळ द्यावे एवढीच विनंती आहे.

माझ्या लहानपणापासून सीमाप्रश्नाचा लढा सुरू आहे. त्यामुळे या लढ्याची अनेक स्थित्यंतर मी पाहिली आहेत. त्यावेळचे दिग्गज नेते आमच्या सोबत होते, त्यांना आम्ही ऐकले आहे. कोणाला मोठेपणा देण्यासाठी किंवा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आम्ही लढतोय असे समजू नये. आम्ही येथे महाराष्ट्राला विनंती करायला आलो आहोत की न्यायालयात खटला भरला म्हणजे सीमाप्रश्न सुटला असे नाही. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. त्याला बळ द्यावे लागते असे सांगून महाराष्ट्राने ते अत्यंत प्रभावीपणे करावे हीच आमची मागणी आहे, असे दीपक दळवी यांनी स्पष्ट केले.Mes morcha

येळळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आझाद मैदानावर उपस्थित असलेले येळ्ळूर ग्रामपंचायतचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आमचा जो ज्वलंत सीमा प्रश्न आहे यासाठी आम्ही न्यायालयीन लढासह कर्नाटकात रस्त्यावर लढा देत आहोत. कर्नाटक सरकार आमच्यावर जो अन्याय अत्याचार करत आहे त्यासंदर्भात मागणं मांडण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. त्याचप्रमाणे न्यायालयीन खटल्यासाठी महाराष्ट्राने चांगल्यात चांगले वकील द्यावेत. एकूणच महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे सांगितले.

बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी सीमाप्रश्न कोणत्या परिस्थितीत आहे हे सर्वश्रुत आहे. आज चौथी पिढी या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत आहे. आम्ही अजून किती दिवस वाट पाहायची? असा सवाल करून महाराष्ट्र या लढ्यात स्वतःला पूर्ण झोकून देत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे असे सांगितले. तसेच कर्नाटकातील सर्वपक्ष महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नासाठी आपापसातील भेदभाव विसरून संघटित होण्याद्वारे एकजूट दाखवतात. महाराष्ट्राने देखील त्याचे अनुकरण करावे याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी झालो आहोत, असे स्पष्ट केले. यावेळी येळळूर समितीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया देताना आझाद मैदानावरील आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.