Saturday, April 20, 2024

/

सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनांचे योगदान

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : भाषा आणि साहित्य संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी सीमाभागात मराठी साहित्य संमेलने भरविली जातात. आज सीमाभागात जवळपास १६ मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. या साहित्य संमेलनांचे विशेष असे वैशिष्ट्य आहे. या साहित्य संमेलनात मिळणारी साहित्याची मेजवानी, यासह वनभोजनाचा आस्वाद, ग्रंथदिंडीतून घडणारे वारकरी संप्रदायाचे दर्शन, साहित्य संमेलनांच्या निमित्ताने जवळून पाहता येणारा ग्रामीण भाग, दरवर्षी या साहित्य संमेलनांच्या माध्यमातून बेळगावसह महाराष्ट्रातील शेकडो थोर विचारवंतांचे विचार ऐकण्याची संधी यासह अनेक गोष्टींची अनुभूती हि येथील साहित्य संमेलनांची खासियत आहे.

बेळगावमध्ये विविध १६ ठिकाणी आयोजिण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनात अनेक थोर विचारवंत आपले विचार मांडतात. बेळगावचे साहित्य विश्व समृद्ध करण्यासाठी हि सर्व संमेलने उपयोगी पडतात. प्रत्येक साहित्य संमेलनांच्या माध्यमातून अनेक साहित्यिकांचे विचार, सीमाभागातील साहित्यिकांना, प्रेक्षकांना आणि साहित्य रसिकांना ऐकायला मिळतात. यामुळे बेळगावचे साहित्य विश्व समृद्ध होत चालले आहे. अनेक लेखन प्रक्रियेबद्दलच्या बाबी या साहित्य संमेलनात चर्चिल्या जातात. यामुळे लेखनविश्वात वेगवेगळ्या साहित्य प्रकारची माहिती समृद्ध होत चालली आहे. साहित्य संमेलनांच्या माध्यमातून साहित्यिक, लेखक आणि लेखनविश्वाशी निगडित असणाऱ्यांना साहित्याच्या प्रकारची माहिती करून घेण्यासाठी साहित्य संमेलनांचा मोठा आधार मिळत आहे. अनेक विचारवंत, साहित्यिकांची वेगवेगळ्या शैलीतील भाषणे, विचार ऐकून, साहित्य संमेलनाच्या ठिकाणी उपलब्ध असलेली साहित्यिकांची पुस्तके वाचून आज अनेक लेखकांच्या शैलीत सुधारणा झाली आहे. सीमाभागातील साहित्यिकांसाठी साहित्य संमेलने साहित्याचा आवाका समजून घेण्यात उपयोगी ठरत आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही साहित्य संमेलनांमुळे खूप मोठा आधार मिळत आहे. महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा विषय निवडला आहे अशा विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनांमुळे मोठी मदत होत आहे. साहित्य संमेलनामध्ये बहुतांशी विचारवंत, व्याख्याते हे महाराष्ट्रातून येत असल्याने, या साहित्यिकांना प्रत्यक्षपणे भेटण्याची संधी मिळते. तसेच अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांवर आधारित पाठ, पुस्तके, विशेष भाषा प्राविण्य मिळविण्यासाठी अध्ययन करणारे विद्यार्थ्यांना साहित्यिकांच्या, लेखकांच्या शैलीचा तुलनात्मक अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना मदत होत आहे.

आज बेळगावमध्ये वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बाल साहित्य संमेलन यासह उचगाव, कडोली, सांबरा, येळ्ळूर, माचीगड, कुद्रेमानी, बेळगुंदी यासह अनेक ठिकाणी होणाऱ्या साहित्य संमेलनांमुळे भाषेचे सूक्ष्म बिंदू असणाऱ्या गोष्टींचे आकलन करणे शक्य होत आहे. कथा, कादंबरी, काव्य यासारख्या विविध साहित्य प्रकारचे आकलन करण्याची क्षमता साहित्य संमेलनांच्या माध्यमातून नवोदित लेखकांपर्यंत पोहोचत आहे. नुकत्याच झालेल्या माचीगड साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ‘राजकारणी नायक होऊ शकत नाहीत तर लेखक नायक होऊ शकतात’ असे विचार मांडले. यामुळे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी विशिष्ट विचार पुढे घेऊन जावे लागतात. आणि हे विचार पुढे जात असताना आपल्याला समाजाचे नीट प्रबोधन करावे लागते. या सर्व गोष्टींचा उहापोह संमेलनाच्या माध्यमातून होणे शक्य आहे. त्यामुळे साहित्य संमेलनांचे साहित्य विश्वात मोठे योगदान असल्याचे सिद्ध होते आणि साहित्य संमेलनांचा निश्चितच फायदा होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.