Friday, April 26, 2024

/

चंद्रकांत दादांचा बेळगाव दौरा :नवा डाव नवी विटी!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका अंतिम टप्प्यावर असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सकारात्मक पद्धतीने सक्रिय झाले आहे. उच्चाधिकार समिती बैठक असो किंवा सीमावासियांच्या भावना जाणून घेऊन त्या पद्धतीने पुढील प्रवासाची तयारी असो याबाबत महाराष्ट्रात वेगवान घडामोडी घडत आहेत. ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र सीमासमन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शंभूराजे देसाई आणि खासदार धैर्यशील माने हे बेळगावमध्ये येत आहेत.Chandrkant dada

बेळगावमध्ये विविध ठिकाणी त्यांचा दौरा असून विविध ठिकाणी सीमावासियांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते येत आहेत. मात्र या दौऱ्यातील महत्वाचे आकर्षण असणारे चंद्रकांतदादा पाटील यांचे आगमन चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या कित्येक वर्षात सीमासमन्वयक मंत्रिपदाची धुरा सांभाळणारे चंद्रकांतदादा पाटील हे आताच कसे बेळगाव दौऱ्यावर येत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रातील मंत्री बेळगावमधील सीमावासियांच्या भावना जाणून घेण्यासाठी येत आहेत, हि सीमावासीयांसाठी महत्वाची बाब आहे. परंतु चंद्रकांतदादा पाटील हे गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगावमध्ये आलेच नाहीत आणि आताच त्यांना बेळगावकरांची आठवण कशी झाली? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

 belgaum

सीमासमन्वयक मंत्रीपदी कार्यरत असणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांनी आजवर सीमावासियांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट गोकाकमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी नाडगीत गाऊन सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळले. यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात सीमावासीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली. त्यांच्यावर रोष व्यक्त झाला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीला वेग आल्याने पुन्हा महाराष्ट्र सरकारने बोलाविलेल्या उच्चाधिकार समिती बैठकीनंतर सक्रिय झालेल्या चंद्रकांतदादा पाटलांनी मागील वेळेस झालेल्या चुकीमुळे ओढवलेला सीमावासियांचा रोष पुसून टाकण्यासाठी, त्यांच्या भावना जाणून घेत त्यांची मने जिंकण्यासाठी ‘नवा डाव, नवी विटी’ यानुसार मार्गक्रमण केले असावे, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील मंत्री सीमावासियांच्या भावना जाणून घेण्यासाठी येत असल्याने सीमावासीयांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले आहे. यामाध्यमातून आपल्या भावना, व्यथा, वेदना महाराष्ट्र सरकार आणि पर्यायाने केंद्र सरकारपर्यंत पोहोचतील, आणि सीमाप्रश्न मार्गी लागेल, अशी भावना सीमावासीयातून व्यक्त होत आहे. यादृष्टीकोनातून सीमावासीय आता चंद्रकांतदादा पाटील, आणि अन्य मंत्रीमहोदयांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सीमाप्रश्नाव्यतिरिक्त येथील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक समस्या देखील आवासून उभ्या आहेत. या समस्यादेखील महाराष्ट्रातील मंत्रिमहोदयांना जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील यांचा बेळगाव दौरा त्यांच्या कारकिर्दीला नवी झळाळी देईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.