बेळगाव : उत्तर भारतातील अयोध्येत जसे राममंदिर बांधले गेले तसे दक्षिण भारतीय कर्नाटकात राममंदिर बांधले जाईल, असे उच्च शिक्षणमंत्री अश्वथ नारायण सांगितले. बुधवारी सुवर्णसौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि घोषणा केली.
कर्नाटकात राम मंदिर उभारणीची घोषणा पुढील अर्थसंकल्पात केली जाईल. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी येऊन राममंदिर जागेची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दक्षिण कर्नाटकात पक्ष मेळाव्याचे आयोजन करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटकात येत आहेत. मंड्यामध्ये देखील अधिवेशन होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे अपेक्षा वाढल्या असल्याचे अश्वथनारायण यांनी सांगितले.
राज्यात मुदतपूर्व निवडणुका होणार नाहीत. निवडणूक आयोग ठरलेल्या वेळीच तारीख जाहीर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस आणि जेडीएस कडून होणाऱ्या डबल इंजिन सरकारच्या टीकेलाही त्यांनी प्रत्त्युत्तर देत डबल इंजिन सरकार सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून सरकार केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसल्याचा टोलाही लगावला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली कोविडचे व्यवस्थापन करण्यात येत असून कोविडबाबत सर्वजण मिळून काम करत आहोत असे अश्वथ नारायण यांनी सांगितले.