Thursday, April 25, 2024

/

बेळगावचा ट्रिपल एसआर, आयर्न मॅन रोहन हरगुडे

 belgaum

क्रीडा कारकीर्द संपविणाऱ्या दुखापतीवर मात करून दुर्दम्य आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर पुन्हा नवी क्रीडा कारकीर्द घडविणारे आणि स्वतःसह आपल्या गावाचा नावलौकिक वाढविणारे क्रीडापटू फार कमी असतात. बेळगावचे ‘आयर्न मॅन’ रोहन हरगुडे हे अशाच क्रीडापटूंपैकी एक आहेत. त्यांनी अलीकडेच प्रतिष्ठेचा ‘आयर्न मॅन 70.3’ हा किताब पटकावला असून बेळगावसाठी अभिमानास्पद बाब म्हणजे सध्याच्या घडीला सायकलिंग मधील ‘ट्रिपल एसआर’ किताब मिळवणारे उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील ते एकमेव सायकलपटू आहेत.

जाधवनगर येथील रहिवासी असलेले शहरातील गृहशोभा इंटरप्राईजेसचे चालक रोहन रामलिंग हरगुडे शालेय जीवनापासून बेळगावातील एक उत्कृष्ट क्रीडापटू म्हणून सुपरीचीत आहेत. कॅम्प येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतलेल्या रोहन यांनी ज्योती पदवी पूर्व महाविद्यालय आणि भाऊराव काकतकर कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि फुटबॉलपटू म्हणून त्यांची ओळख होती. क्रिकेटमध्ये युनिव्हर्सिटी ब्लू मिळविणाऱ्या रोहन यांना धारवाड विद्यापीठाने उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविले आहे. क्रिकेट आणि फुटबॉल व्यतिरिक्त रोहन हरगुडे हे टेबल टेनिस, कॅरम आणि बुद्धिबळ या खेळातही चॅम्पियन होते.

फुटबॉलमध्ये 2000 साली राष्ट्रीय पातळीपर्यंत धडक मारणाऱ्या रोहन यांना 2013 मध्ये अपघाताला सामोरे जावे लागले. अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. डाव्या पायाला स्क्रू बसविण्यात आले आणि त्याची क्रीडा कारकीर्द झाकोळली. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना क्रिकेट, फुटबॉल, धावणे वगैरे वेगवान खेळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. Rohan hargude

 belgaum

डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे रोहन यांना क्रीडा क्षेत्रातून सुमारे दोन-तीन वर्षे अज्ञातवास पत्करावा लागला. रोहन यांच्या पायाला झालेली दुखापत लक्षात घेता दुसरा कोणी असता तर त्याने क्रीडा क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला असता, मात्र रोहन यांनी अजिबात न खचता पुन्हा क्रीडा क्षेत्रात पदार्पण करण्याचा ठाम निर्णय घेतला. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी 2016 -17 मध्ये प्रथम सायकलिंग आणि पोहण्याचा व्यायाम सुरू केला. त्याच दरम्यान शहरात वेणुग्राम सायकलिंग क्लबची स्थापना झाली आणि रोहन जवळ जवळ या क्लबचे संस्थापक सदस्य बनले. पुढे क्लबचे अध्यक्ष संतोष शानभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इतरांचे पाहून त्यांच्या प्रो सायकलींगला सुरुवात झाली.

रोहन यांची प्रगती इतकी झपाट्याने होती की या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत झालेली सुपर रॅन्डोनियर ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या बेळगावच्या 11 जणांमध्ये त्यांचा समावेश होता. एवढेच नव्हे तर वर्षभरात त्यांनी तीन सुपर रॅन्डोनियर मोहिमा पूर्ण करण्याचा पराक्रम करून ‘ट्रिपल एसआर’ हा किताब हस्तगत केला. हा किताब मिळविणारे ते उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील एकमेव सायकलपटू आहेत हे विशेष होय.

सायकलिंग सुरू असतानाच दरम्यानच्या काळात सुपर रॅन्डोनियर झाल्याबद्दल रोहन हरगुडे यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना भेटलेल्या बेळगावच्या महिला आयर्न मॅन मयुरा शिवलकर यांनी रोहन यांना जगात सर्वात खडतर समजल्या जाणाऱ्या आयर्न मॅन आंतरराष्ट्रीय शर्यतीत भाग घेण्यास सुचविले. मयुरा शिवलकर या एकमेव भारतीय महिला आहेत, ज्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीद्वारे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करून आयर्न मॅन किताब पटकावला आहे. शानभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग बरोबरच जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी व इंद्रजीत हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन पोहण्यातही तरबेज झाले होते. मात्र पोहणे सायकलिंग आणि धावणे या क्रीडा प्रकारांचा सलग समावेश असलेल्या आयर्न मॅन शर्यतीसाठी इतके पुरेसे नव्हते. त्याकरिता धावण्याचे कौशल्य -सराव आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन रोहन यांनी हवाई दलाचे सेवानिवृत्त सार्जंट जगदीश शिंदे यांचेकडून धावण्याचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर 6 महिने खडतर मेहनत घेऊन त्यांनी गेल्या नोव्हेंबर 13 रोजी झालेल्या गोवा आयर्न मॅन 70.3 आंतरराष्ट्रीय शर्यतीत भाग घेऊन ती बेळगावच्या आपल्या अन्य पाच सहकाऱ्यांसह यशस्वीरित्या पूर्ण केली. या पद्धतीने ‘आयर्न मॅन’ बनण्याबरोबरच रोहन हरगुडे यांनी ‘ट्रायथलीट’ बनण्याचा अधिकृत मान मिळवला.Rohan hargude

बेळगाव लाईव्हशी बोलताना ट्रायथलीट रोहन हरगुडे यांनी उपरोक्त यशाचे संपूर्ण श्रेय आपले स्वतः घेतलेली कठोर मेहनत तसेच आपले मार्गदर्शक संतोष शानभाग उमेश कलघटगी इंद्रजीत हलगेकर व जगदीश शिंदे यांना यांना दिले. याखेरीस मला ट्रिपल एसआर आणि आयर्न मॅन बनवण्यात माझा लहान भाऊ चार्टर्ड अकाउंटंट सुनील हरगुडे याचा सिंहाचा वाटा असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

तसेच तंदुरुस्त आरोग्य ही यशस्वी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे हे लक्षात घेऊन आजच्या युवा पिढीने इतर महत्त्वाच्या गोष्टींबरोबरच व्यायाम आणि खेळावर देखील लक्ष केंद्रित करावे असे आवाहन करून त्यासाठीच आपण वेळोवेळी मैदानावर भेटणाऱ्या शालेय मुलामुलीसह युवकांना प्रोत्साहित करत असतो, असेही रोहन हरगुडे यांनी स्पष्ट केले.

-महेश सुभेदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.