Friday, July 19, 2024

/

फैलाव रोखणे हा लंपी स्कीनवर एकमेव उपाय

 belgaum

लंपी स्कीन हा संसर्गजन्य रोग असून त्यावर विशिष्ट ठराविक उपचार नाहीत. त्यामुळे लंपी स्किनला आळा घालण्यासाठी त्याचा होणारा फैलाव रोखणे हा एकमेव उपाय आहे असे स्पष्ट करून गाय, बैल व कांही प्रमाणात म्हशी वगळता कोंबड्या वगैरे इतर कोणत्याही पशुपक्षाला या रोगाची लागण झाल्याचे आढळून आले नसल्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बेळगाव शहर व तालुका पशु संगोपन खात्याचे अधिकारी डॉ. आनंद पाटील यांनी केले.

सध्या सर्वत्र विशेष करून ग्रामीण भागात लंपी स्कीन या रोगाने हाहाकार माजवला आहे. या रोगामुळे अनेक गाई, बैलांचा मृत्यू होत असून असंख्य जनावरे आजारी आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने लंपी स्कीन रोगाचा उगम, तो कशामुळे होतो, त्यावरील उपचार आदी माहिती जाणून घेण्यासाठी आज शनिवारी पशु संगोपन खात्याचे अधिकारी डॉ. आनंद पाटील यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. संसर्गजन्य लिंपी स्कीम रोग जगात सर्वप्रथम आफ्रिका देशात आढळून आला. आपल्या देशात गेल्या एक-दोन वर्षापासून या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. देशात सर्वप्रथम ओरिसा राज्यात लंपी स्किनचा संसर्ग आढळून आला तिथून तो आता देशातील 14 पेक्षा जास्त राज्यात फैलावला आहे. सध्या आपल्याकडे बेळगाव तालुक्यात या रोगाचा संसर्ग दिसून येत आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

लंपी स्कीन रोगाच्या विषाणूला फॉक्स व्हायरस म्हंटले जाते. शेळ्यांमध्ये त्याला गोट पाॅक्स किंवा शिप पाॅक्स म्हटलं जातं या दोन्ही रोगांचा पाॅक्स व्हायरस हा उत्पत्ती केंद्र (मदर व्हायरस) आहे. पाॅक्स व्हायरस हा अत्यंत जुना आहे. प्रत्येक वायरस कालांतराने आपले स्वरूप बदलत असतो. मागील वर्षी देखील या व्हायरसची लागण झाली होती. परंतु त्याची तीव्रता आणि फैलाव जास्त नव्हता. मात्र यंदा या रोगाची तीव्रता आणि पहिला मोठ्या प्रमाणात आहे. लंपी स्किन हा संसर्गजन्य रोग आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाला ठराविक उपचार नसतात त्यावर फक्त लक्षणात्मक उपचार केले जातात. लंपी स्किन रोगाचे प्राथमिक लक्षण म्हणजे जनावराला 104, 105, 106 डिग्रीपर्यंत भयानक ताप येतो. त्यानंतर डोळे आणि नाकातून द्रव वाहू लागतो पुढे अंगावर पुरळ फोड येतात आणि ते फुटण्यास सुरुवात होतात त्यातून रसकी वाहू लागते. या रोगाच्या गंभीर अवस्थेत योग्य उपचार आणि देखभाल झाली नाही तर पाय सुजणे, घंगाळ (गाईचे सड) सुजणे या गोष्टी सुरू होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

लंपी स्कीनला आळा घालण्यासाठी सर्वप्रथम या रोगाचा प्रसार थांबविला पाहिजे. जनावरं एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे हा रोग फैलावतो. मोकळे सोडलेले रोगग्रस्त जनावर जिथे जिथे जाते तिथे त्याच्या डोळे व नाकातून वाहणारे पाणी किंवा जखमेमधील द्रवामुळे इतर जनावरांना संसर्ग होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डास, माशा तसेच जनावरांच्या अंगावरील रक्तपिपासू गोचडी वगैरे सारखे जीव यांच्यामुळे या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. यासाठी या रोगाचा प्रसार थांबवणे हे एकमेव ध्येय सर्वांसमोर असले. त्याकरिता बाधित जनावर बाहेर नेऊ नका. त्यांना शक्यतो बंदिस्त जागेत ठेवण्याचा प्रयत्न करा. जमल्यास माशावर डासांपासून संरक्षण व्हावे यासाठी जनावरांना मच्छरदाणीची सोय करा. तसेच घराचा परिसर विशेषता गोठा वगैरे स्वच्छ ठेवावा. उपद्रवी डास -माशांना पळविण्यासाठी आपण पूर्वीपासून गोठ्यामध्ये धूर करतो. आता तो धूर करताना कडुलिंबाच्या पाल्याचा वापर करावा. त्यामुळे डास -माशांना आळा बसू शकेल, असे मार्गदर्शन डाॅ. आनंद पाटील यांनी केले.

सदर रोगाला आळा घालण्यासाठी पशु संगोपन खाते सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आमच्या खात्याकडून जनजागृती मोहीम राबविली जात असून उपरोक्त उपाय शेतकऱ्यांना समजावून दिले जात आहेत. शेतकऱ्यांना स्वतः हे उपाय करण्यास सांगण्याबरोबरच महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींना त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आपल्या जनावरांमध्ये लंपी स्कीनची लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरित जवळच्या सरकारी पशु चिकित्सालयाशी संपर्क साधावा. सदर रोग वेळीच लवकरात लवकर योग्य उपचार केल्यास आटोक्यात येऊ शकतो. या रोगावरील उपचारासाठी देशव्यापी मार्गदर्शक सूची जारी करण्यात आली आहे. त्यानुसार उपचार होणे आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते असे सांगून यावेळी गो-वंश म्हणजे गाई आणि बैलांना या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. सुदैवाने म्हशींना जास्त संसर्ग झालेला नाही, असे ते म्हणाले.Lampi skin

आमच्या खात्यातर्फे अहोरात्र उपचार मोहीम राबविली जात आहे. शेतकऱ्यांच्या घराघरापर्यंत जाऊन जनावरांवर उपचार केले जात आहेत. दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी हा रोग आढळतो तिथे लसीकरण करता येत नाही. या रोगावर ठराविक अशी लस उपलब्ध नाही. त्यामुळे देशव्यापी मार्गदर्शक सूचीनुसार गोट पाॅक्स व्हॅक्सीन या लसीद्वारे लंपी स्कीन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे लसीकरण संसर्गजन्य ठिकाणाच्या 5 कि. मी. परिघा बाहेरील क्षेत्रात केले जात आहे. आतापर्यंत बेळगाव तालुक्यातील 7500 जनावरांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

जनावरांपासून लंपी स्किनचा संसर्ग मनुष्याला झाल्याचे कोणतेही उदाहरण नाही आणि तो होतही नाही. गाय, बैल आणि कांही प्रमाणात म्हशी वगळता कोणत्याही पशुपक्षाला हा रोग झालेला नाही. कोंबड्यांना तर नाहीच नाही. तशी अफवा जर कोणी पसरवत असेल तर लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये . दुधावरही या रोगाचा कांहीही परिणाम होत नाही. आपण दूध गरम करून पिऊ शकतो, असे डॉ. आनंद पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.